Breaking News

पारनेरसाठी कुकडी, पिंपळगाव जोगा धरणातून आवर्तन कांदा, भुईमुग, वाटाणा पिकाला फायदा


पारनेर/ प्रतिनिधी ः
उन्हाळी हंगामासाठी कुकडी व पिंपळगाव जोगा धरणातून 44 दिवसांचे आवर्तन सोडण्यात आले आहे. याचा फायदा उन्हाळी कांदा, भुईमूग, वाटाणा या पिकांसह फळबागांना होणार आहे.
या आवर्तनाबाबत शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. दुसरीकडे या आवर्तनाचा फायदा शेतीबरोबर पिण्याच्या पाण्यासाठीही होणार आहे. जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कुकडी प्रकल्पातून व पिंपळगाव जोगा धरणातून पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना पाणी मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता.
या दोन्ही धरणाच्या संबंधित अधिकार्‍यांची भेट घेऊन किती पाणीसाठा शिल्लक आहे याची माहिती घेण्यात आली होती. हे आवर्तन सोडण्यात यावे अशी लेखी मागणी मंत्री पाटील यांच्याकडे करण्यात आली होती.
 त्या अनुषंगाने 13मार्च रोजी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन 44 दिवस चालणार आहे. कुकडी डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे अळकुटी, निघोज, वाडेगव्हाण, देवीभोयरे, गाडीलगाव, राळेगण थेरपाळ, म्हसे या गावातील शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे. सध्या कुकडी प्रकल्पामध्ये 17.51 टीएमसी म्हणजे या प्रकल्पांमध्ये 59 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. हेडपर्यंत असणार्‍या शेतकर्‍यांना या आवर्तनाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी केली आहे.
दुसरीकडे पिंपळगाव जोगा धरणातूही आवर्तन सोडण्यात आले आहे. याचा फायदा रांधे, दरोडी, अळकुटी, लोणीमावळा, देवीभोयरे, वडझिरे या गावांना होणार आहे. तरी शेतकर्‍यांनी पाणी मागणीसाठी संबंधित विभागाकडे आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन आमदार लंके यांनी केले आहे.