Breaking News

इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची अखेर सुटका

नवी दिल्ली : करोनाच्या भीतीनं इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांची मंगळवारी अखेर एअरलिफ्ट करून सुटका करण्यात आली. पहिल्या फेरीत तब्बल 58 भारतीयांना घेऊन भारतीय हवाईदलाचं सी-17  ग्लोबमास्टर विमान भारतात परतले. या 58 भारतीयांमध्ये 25 पुरुष, 31 स्त्रिया आणि 2 लहान बालकांचा समावेश आहे. तपासणीसाठी या विमानातून 529 सॅम्पल्सही आणले गेलेत. गाझियाबादच्या हिंडन एअरफोर्स स्टेशनवर या विमानाचं लॅन्डिंग झालं.  परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी श्रीनगर दौरा केला. यावेळी, त्यांनी करोना व्हायरसशी झुंजणार्‍या आणि इराणमध्ये अडकलेल्या काश्मीर विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांना दिलासा दिला. तसंच या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी लवकरात लवकर प्रयत्न करणार असल्याचं आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिलं. भारत सरकार अगोदर तीर्थयात्राकरुंना इराणमधून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.  उल्लेखनीय म्हणजे, इराणमध्ये तब्बल 2 हजार भारतीय अडकले आहेत. इराणमध्ये आत्तापर्यंत करोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सोमवारपर्यंत 237 वर पोहचलीय तर इराणमध्ये समोर आलेल्या 7167 रुग्णांपैंकी 2394 जण करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.