Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा


मुंबई ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. पण कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शरयू तीरावर त्यांच्या हस्ते आरती होणार नाही. या संदर्भात उत्तर प्रदेश सरकारने केलेली विनंती मान्य करण्यात आली असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्तेत असलो तरी हिंदूत्त्व सोडलेले नाही हे दाखवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौर्‍याचे नियोजन करण्यात आले आहे. या दौर्‍याची घोषणा गेल्याच महिन्यात संजय राऊत यांनी केली होती. त्यासाठी सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे.  संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यात गुरुवारी रात्री फोनवरून बोलणे झाले आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून या दौर्‍यासाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षा पुरविली जाणार आहे. देशात सध्या कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यावर भर दिला जात आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही या संदर्भात काही निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शरयू तीरावर आरतीसाठी गर्दी होऊ नये. म्हणून दौर्‍यातील आरतीचा कार्यक्रम वगळावा, अशी विनंती करण्यात आली होती. देशातील एकूण परिस्थिती लक्षात घेता उद्धव ठाकरे यांनी ही विनंती मान्य केली आहे, असे त्यांनी सांगितले.