Breaking News

'आस्थापना'च्या आंबटशौकिन अधिकाऱ्याचा प्रताप! महिला कर्मचाऱ्याकडे केली विचित्र मागणी

अहमदनगर / प्रतिनिधी :
जागतिक महिलादिनाच्या आदल्या दिवशीच येथील महानगरपालिकेत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. मनपाच्या आस्थापना विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पदाचा गैरवापर करत महिला कर्मचाऱ्यांकडे शरीरसुखाची विचित्र मागणी केली. या महिलेने या प्रकारासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निनावी पत्राद्वारे तक्रार केली. या प्रकारामुळे मनपा कार्यालयाच्या परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निनावी पत्रात महिलेने म्हटले आहे, की मी आणि माझ्यासारख्या महिला कर्मचारी भगिनींना दुसऱ्या महापालिकेतून गैररित्या सामावून घेतलेले आणि सध्या आस्थापना विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणूनमः कार्यरत असलेले कार्मचारी जाणिवपूर्वक ब्लॅकमेल करून शरीर सुखाची मागणी करतात. आतापर्यंत अनेक महिला कर्मचाऱ्यांना या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा वाईट अनुभव आलेला आहे. पदाधिकारी, अधिकारी आणि स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करून भीती दाखवून हा कर्मचारी महिलांवर दबाव टाकतो. तसेच मनपा युनियनचे पदाधिकारीदेखील त्याला पाठीशी घालतात. महापालिकेत तक्रार कोणाकडे करावी, हा संभ्रम आहे. सदर कर्मचाऱ्यावर मनपा पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची मर्जी आहे. त्यामुळे हा कर्मचारी वाट्टेल तशी मनमानी करत आहेत. जोपर्यंत या कर्मचाऱ्याला या महापालिकेतून दुसरीकडे पाठविले जात नाही, तोपर्यंत त्याच्या जाचाला कंटाळून मोठी अप्रिय घटना घडलेली असेल. असा दुर्दैवी प्रकार घडल्यास त्यासाठी संपूर्ण महापालिका जबाबदार असेल. त्यामुळे या गंभीर प्रकरणात तातडीने लक्ष घालून महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्यावी, असे या निनावी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, दि. जानेवारी रोजी पाठविलेले हा निनावी पत्र दि. १० जानेवारी रोजी पोहोचले आहे. दरम्यान, या पत्रावर नगरविकास मंत्रालय काय कारवाई करते, याविषयी मोठी उत्कंठा व्यक्त आहे.