Breaking News

शहरातील बराचसा भूभाग स्वच्छता अभियानापासून अलिप्त

अहमदनगर /प्रतिनिधी : उपनगरासह शहरात पहाटे 5 वाजल्यापासून मनपाची कचरागाडी फिरत आहे व नागरिकांना कचरा कचरागाडीतच टाकण्याचे आवाहन करत आहे. महापालिकेने आवाहनासाठी वापरलेले गाणे ‘घंटागाडी आली हो कचरागाडी आली’ हे भलतेच लोकप्रिय ठरत आहे. काही भागात तर नागरिक साखर झोपेतच असतानाच गाण्याच्या रेकॉर्डसह महापालिकेची कचरागाडी फिरत आहे.
महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य असला तरी त्या उपक्रम राबविण्यात बर्‍याच उणिवा आहे. त्यातील पहिली म्हणजे सकाळी ज्या भागात सकाळी एकदा कचरागाडी येऊन जाते त्या भागात ती पुन्हा दिवसभरात फिरकत नाही. त्यामुळे दिवसभरात ज्या जागेला कचराकुंडीचे स्वरुप देण्यात आलेले आहे त्या जागेवरच कचरा टाकला जातो. त्यामुळे त्या कचरकुंडीतील जागेचे कचरा संकलन होत नसल्यामुळे तेथील कचरा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
शहरातील आयुर्वेद परिसरातील काटवन खंडोबा परिसरात मोठ्या प्रमाणात कचर्‍याचे साम्राज्य दिसून येते. महानगरपालिकेने या भागात काही स्वच्छता कर्मचारी तैनात करुन येथील परिसरात स्वच्छता मोहिम राबवावी. महापालिकेचे स्वच्छता कर्मचार्‍यांना त्यांना ठरवून दिलेल्या प्रभागात कचरा संकलनाचे काम नियमित करत असतात. परिणामी शहरातील काही भाग हे स्वच्छता करण्यापासून दुर्लक्षित राहतात. अशा परिसरात स्वच्छता अभियान राबविणे महत्त्वाचे आहे. कारण अशा वर्षानुवर्षे पडून राहिलेल्या कचर्‍यातून परिसरासह शहरात रोगराई तसेच साथीच्या रोगांचा प्रसार करणार्‍या डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे महापालिकेने आपले स्वच्छता मोहिम अभियान या परिसरात राबविणे गरजेचे आहे.
स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, संबंधित भागातील नगरसेवक साफसफाई करण्याचे काम करतात. परंतु तो एक केवळ देखावा ठरतो. बर्‍यापैकी स्वच्छता असलेल्या जागेतच त्यांच्याकडून साफसफाई केली जाते आणि ज्या ठिकाणी खर्‍या अर्थाने साफसफाईची गरज आहे ती जागा मात्र स्वच्छतेपासून वंचित राहते.
शहराच्या घोषित कचराकुंड असलेल्या काही रस्त्यांवरील जागेवरच कचरा संकलन केले जाते. परंतु शहरातील काही भाग म्हणजे दादासाहेब रुपवते महाविद्यालयापासून मागील वर्षी उद्ध्वस्त करण्यात आलेले शरणमार्केट ते सर्जेपुरा रंगभवन असा मागील रस्ता वर्षानुवर्षे कचर्‍याच्या विळख्यात आहे. तीच परिस्थिती पेमराज सारडा मागील सिद्धार्थनगर परिसराची आहे. सिद्धार्थनगर परिसरात विविध भागात वर्षानुवर्षे कचर्‍याचे साम्राज्य आहे. कोठला स्टॅण्ड परिसरातही वर्षानुवर्षे नागरी सुविधांचा अभाव, कचराकुंडी समस्या तसेच ड्रेनेज लाईन फुटण्याच्या समस्या होत असतात. या परिसरात स्वच्छतेची मोठी आवश्यकता असतानाही वर्षानुवर्षे हे भाग अस्वच्छतेच्या विळख्यात आहेत. महापालिकेने शहरातील सर्व दुर्लक्षित भूभागांवर हे स्वच्छता अभियान काटेकोरपणे राबविणे गरजेचे आहे.