Breaking News

साखरेच्या एम.एस.पी.दरात बदल करणे आवश्यक : आमदार आशुतोष काळे

कोपरगाव/ प्रतिनिधी : “केंद्र शासनाने देशामध्ये साखरेची किमान विक्री किंमत प्रतिकिलो 31 रुपये ठरविलेली आहे. यामध्ये सर्वच ग्रेडच्या साखरेस किमान विक्री किंमत ठेवणे योग्य नसून त्या ऐवजी साखरेची ग्रेडनिहाय किंमत ठेवणे आवश्यक आहे. राज्यात साखरेचे उत्पादन घेत असतांना साखर कारखान्यांना एक किलो साखर तयार करण्यासाठी जवळपास 40 रुपये खर्च येत असून साखर व उपपदार्थाचे उत्पन्न धरून कारखान्यांना प्रती टन अंदाजे 400 ते 500 रुपये तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे कारखान्यांची आर्थिक परिस्थिती बिघडत असल्यामुळे साखरेच्या एम.एस.पी.दरात बदल करणे आवश्यक आहे’’, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी केले. 
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 65 व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोक काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली व्हा. चेअरमन पद्माकांत कुदळे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करून करण्यात आली. याप्रसंगी आमदार काळे बोलत होते.
 ते पुढे म्हणाले, मागील वर्षी उन्हाळी हंगामात तीव्र दुष्काळ परिस्थिती व कालव्यांना रोटेशन न मिळाल्यामुळे ऊस लागवडी कमी झाल्या होत्या. तसेच उपलब्ध ऊस चार्‍यासाठी वापरल्यामुळे कार्यक्षेत्रात ऊसाची टंचाई होती. कार्यक्षेत्रातून 2 लाख व कार्यक्षेत्राबाहेरून दीड लाख टन ऊस उपलब्ध होऊन साडेतीन लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु उत्कृष्ट नियोजन, कारखान्यावर ऊस उत्पादकांची असलेली विश्‍वासार्हतेच्या जोरावर अनेक अडचणींचा सामना करून गळीत हंगाम यशस्वी करून दाखवत 3 लाख 65 हजार 62 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 3 लाख 94 हजार क्विंटल साखर उत्पादन होऊन 10.79 एवढा साखर उतारा मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू वर्षी एफ.आर.पी. दर 2,392/- एवढा असताना कारखान्याने इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना सरसकट 2,500/- रुपये दर दिला असून हा दर अंतिम नसल्याचे सांगत पुढील परिस्थितीनुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाला आहे. गोदावरी कालव्याचे आवर्तन सुरु असून पाटबंधारे विभागाने सात नंबर अर्जावर ऊस पिकास पाणी देण्याचे धोरण ठरविले आहे. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपले पाणी मागणी अर्ज दाखल करून उन्हाळी हंगामात मिळणार्‍या दोन उन्हाळी आवर्तनाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त ठिबक जलसिंचनाचा वापर करावा असे आवाहन केले. 
यावेळी ऊसटंचाईच्या काळात कारखान्याला उसाचा पुरवठा करून हंगाम यशस्वी केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकर्‍यांंचे, ऊस तोडणी मजूर, वाहतूक ट्रकधारक व संबधित घटकांचे त्यांनी यावेळी आभार मानले.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे, उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी. बी. सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी एस.डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर डी. बी. चव्हाण, चीफ इंजिनिअर एन. बी.गांगुर्डे, शेतकी अधिकारी के.व्ही. कापसे, चीफ केमिस्ट एस. जे. ताकवणे, चीफ अकाउंटंट एस. एस. बोरनारे, तसेच उद्योग समूहाच्या संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी यांच्यासह सभासद, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन जनरल मॅनेजर सुनील कोल्हे यांनी केले तर आभार संचालक सचिन चांदगुडे यांनी मानले.