Breaking News

खडसावताच अधिकारी, ठेकेदार लागले कामाला आमदारांच्या वॉचचा घेतला धसका


कर्जत/प्रतिनिधी ः
कर्जत येथे जनता संवाद घेऊन आमदार रोहित पवार यांनी ठेकेदार व अधिकार्‍यांना चांगलेच खडसावले होते. त्याचा परिणाम ताबडतोब दिसू लागला आहे. कर्जतच्या कामांवर आता पवारांचा वॉच असल्याचा धसका घेत ठेकेदार आणि अधिकारी आता चांगलेच कामाला लागले आहेत. निकृष्ट कामांवर लक्ष केंद्रीत केल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मतदारसंघातील प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी कर्जत येथे नुकताच जनता संवाद घेतला होता. यामध्ये नागरिकांनी कित्येक विकासकामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी केल्या. त्यावेळी आमदार पवार यांनी आक्रमक होत ठेकेदार व अधिकार्‍यांना खडे बोल सुनावले होते. त्याचा धसका घेतल्याचे चित्र आता दिसू लागले आहे. कामात कुचराई करणारे अधिकारी, कर्मचारी तसेच ठेकेदारांनी पवारांच्या कार्यपद्धतीचा चांगलाच धसका घेतला आहे.
  यामुळे प्रलंबित कामे वेगाने सुरू झाली आहेत. ठेकेदारांच्या कामावर आता पवारांचा वॉच असल्याने ठेकेदारांच्या कामातही बदल दिसू लागल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
जनता संवादात आमदार पवार यांनी ठेकेदार व अधिकार्‍यांना अपूर्ण कामे वीस दिवसात पूर्ण करण्याची तंबी दिली होती. कामात कुचराई करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही त्यांनी ठेकेदारांना दिला होता. अपूर्ण असलेल्या कामांची पूर्ण बिले काढणार्‍यांबाबत कसलीही तडजोड होणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले होते.
त्याचा धसका घेत आता ठेकेदार आणि अधिकारी कामाला लागले आहेत. माजी मंत्री राम शिंदे यांच्या कार्यकाळात अनेक कामे निकृष्ट झाल्याच्या तक्रारी होत्या. सध्याही शासकीय कार्यालयांमध्ये ग्रामस्थांचे निकृष्ट कामांबाबतचे कित्येक तक्रार अर्ज पडून आहेत. आमदार पवार यांनी मात्र ठेकेदारीच्या कामांवर लक्ष केंद्रित केल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.