Breaking News

डिजिटल शिक्षण काळाची गरज : अगरवाल


प्रतिनिधी / पारनेर
प्राथमिक शिक्षण तंत्रज्ञानाशी जोडलं गेलं तर ग्रामीण विद्यार्थीही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकू शकेल. जे तंत्रज्ञान शहरात अनेक शाळांमध्ये उपलब्ध नाही, असे तंत्रज्ञान आपण देऊ शकलो, याबद्दल समाधान आहे. ग्रामसमृध्दी फाऊंडेशनने पुढाकार घेऊन एक चांगलं काम उभं केलं आहे आणि या कामात प्रयास ट्रस्टला योगदान देता आले, याचा आनंद आहे. डिजिटल शिक्षण ही काळाची गरज आहे, असे मत एल अँड टी समूहाचे एरिया मॅनेजर नितिन अगरवाल यांनी केले.
ग्रामसमृध्दी फाऊंडेशन वडनेर बु. आणि एल अँड टी प्रयास ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा वर्गखोली नुतनीकरण, डिजिटल इंटरॅक्टिव्ह क्लासरूम आणि रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
बांधकाम कृषी सभापती काशिनाथ दाते उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडनेर बुद्रूकच्या प्रांगणात नुकताच पार पडला. यावेळी बोलताना दाते म्हणाले की, ग्रामसमृध्दी फाऊंडेशनने प्रयास ट्रस्टच्या सहकार्याने एक चांगला उपक्रम राबवला आहे. जिल्ह्यातील अनेक डिजिटल वर्गांचे आपण उदघाटन केले. परंतू हा वर्ग अद्वितीय असाच म्हणावा लागेल. ग्रामसमृध्दी फाऊंडेशन सारखे गावाबाहेर राहणारे तरुण मातीशी जोडले गेले आहेत. अशाच संस्था प्रत्तेक गावात कार्यरत झाल्या तर ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा नक्कीच बदलू शकतो, असेही ते म्हणाले. गावातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लावली जातील, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याच दिवशी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. शेकडो रक्तदात्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला. ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्या संकेतस्थळाचे अनावरणही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटीचे सदस्य शिक्षण खात्याचे अधिकारी, शाळा व्यवस्थान समितीचे सदस्य, ग्रामसमृध्दी फाऊंडेशनचे सभासद, शिक्षक, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश येवले यांनी तर प्रास्ताविक विकास बबन वाजे यांनी केले.  ग्रामसमृध्दी फाऊंडेशनच्या सभासदांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. मुख्याध्यापक गणपत देठे यांनी आभार मानले.