Breaking News

ज्येष्ठ नागरिकांच्या अनुदानात दुप्पट वाढ ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांची घोषणा


मुंबई ः ज्येष्ठ स्त्री-पुरुषांना राज्य सरकारने मदतीचा हात दिला असून, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी केली. राज्य शासनाच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिनाच्या राज्यव्यापी महिला सक्षमीकरण मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली.
मुश्रीफ म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थींचे अनुदान दुप्पट करण्यात येणार आहे.  65 वर्षांवरील ज्येष्ठांचा मदतनिधी मासिक एक हजार रुपयांवरुन दुप्पट म्हणजे दोन हजार रुपयांपर्यंत वाढवला जाणार आहे. मागील पाच वर्षांत बंद झालेल्या निराधार योजनेची पेन्शन योजना सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 21 हजारांवरुन 50 हजार रुपये करण्यात येईल. महापूरग्रस्त महिलांनी मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांच्याकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शासकीय रिक्त जागेची मेगा भरती सुरु होणार असून महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे, अशा घोषणा करून त्यांनी महिलांना महिला दिनाची भेट दिली. पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, महापालिका, जिल्हा परिषदेमध्ये महिलाराज आहे. बचत गटाच्या अध्यक्ष ही नवी ओळख पुढे आली आहे. जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात महिलांचे योगदान आहे. लवकरच आम्ही दुधाला चांगला भाव देणार आहोत.