Breaking News

नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह परिचारिकांची रॅली

अहमदनगर/ प्रतिनिधी : येथील प्रयत्न नर्सिंग कॉलेज व जिल्हा रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी परिचारिकांनी एकत्र येऊन स्तनांच्या व गर्भाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक उपचार व जागृती निर्माण करणे या उद्देशाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप
मुरंब्रीकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून डीवायएसपी प्रांजल सोनवणे उपस्थित होत्या. कार्यक्रमास प्रयत्न नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या माधुरी मकासरे, जिल्हा रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य खटके, शिक्षकवृंद स्मिता तडके, सौरभ शिंदे, रोहित सगळगिळे, अमिश शिंदे, दीक्षा माने, लीना कांबळे उपस्थित होत्या.
प्रयत्न नर्सिंग कॉलेज व जिल्हा रुग्णालय परिचर्या प्रशिक्षण विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्रितपणे गर्भाशयमुख व स्तनांच्या कर्करोगाविषयीचे फलक हाती घेऊन परिसरातून रॅली काढली. या माध्यमातून समाजामध्ये जागृती करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गर्भाशयमुखाचा कर्करोग या विषयावर पथनाट्य सादर केले, तसेच या विषयीच्या पोस्टर प्रदर्शनात सहभाग घेतला.
आजच्या काळात होणार्‍या स्तनांच्या व गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील महागड्या व खर्चिक उपचारांमुळे कर्करोग न होण्यासाठी करण्यात येणारा प्रतिबंध खूप महत्त्वाचा झाला आहे. कारण या आजारावर उपचारापेक्षा या आजारांचा प्रतिबंध करणे खूप स्वस्त आहे. डीवायएसपी प्रांजल सोनवणे यांनी प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असे सांगितले.
40 वयानंतर महिलांमध्ये स्तनांचा व गर्भाशयमुखाचा कर्करोग याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. त्यासाठी कर्करोगाचे मूल्यमापन व प्रतिबंध कसा करावा, याचे स्पष्टीकरण डॉ. प्रदीप मुरंब्रीकर यांनी केले.
पोस्टर प्रदर्शन व रॅली आयोजनात सहभाग घेऊन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रयत्न नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष डॉ. विक्रम म्हस्के, संचालिका डॉ. शीतल म्हस्के, प्राचार्या माधुरी मकासरे आदींनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.