Breaking News

शिर्डीमध्ये रविवारपासून परिक्रमा महोत्सव प्रथम नगराध्यक्ष कोते यांची माहिती


शिर्डी/ प्रतिनिधी ः
साईबाबांनी आपल्या हयातीत रोगांना थांबविण्यासाठी स्वतः जात्यात पीठ दळून ते पीठ शिर्डी सीमेवर टाकण्यास सांगितले. हा संदर्भ देत सध्या करोना आजारापासून जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी पुन्हा बाबांच्या याच कार्याचे अनुकरण करण्यात येणार आहे. शिर्डी शहरात शिर्डी ग्रामस्थ आणि ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन शिर्डी फाउंडेशनच्या वतीने शिर्डी परिक्रमा महोत्सव 2020 साजरा करण्यात येणार आहे, असे शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी सांगितले.
  15 मार्च रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी अनेक महंत, साधू- संत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे शिर्डी येथे झालेल्या बैठकीत कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, ग्रीन अ‍ॅण्ड क्लीन शिर्डी फाउंडेशनचे अजित पारख यांनी सांगितले.
महोत्सवासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शिर्डी ग्रामस्थांनी केले आहे. 15 मार्चला सकाळी सहा वाजता शिर्डी येथील खंडोबा मंदिर येथून परिक्रमा सुरु होणार आहे. या माध्यमातून साईंची सेवा करण्याची पवित्र संधी सर्वांना मिळेल. शिर्डीच्या सर्वांगीण विकासामध्ये योगदान देता येईल. तसेच जगभरात धुमाकूळ घातलेल्या करोना व्हायरसच्या वाढत्या फैलावास रोखण्यासाठी मदत होईल, असे नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी सांगितले.
साई बाबांनी जगाला सर्वधर्म समभाव हा संदेश दिला. या परिक्रमेमध्ये साधूसंत सामील होणार आहेत. हा एक ऐतिहासिक कार्यक्रम ठरणार आहे, असे कैलासबापू कोते म्हणाले. या बैठकीला नगराध्यक्ष कोते, कैलासबापू कोते, डॉ. एकनाथ गोंदकर, अजित पारख, अनिल शेजवळ, डॉ. जितेंद्र शेळके, ताराचंद कोते आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.