Breaking News

वृक्षतोडीमुळे कर्जत तालुक्यातील जंगले होतायेत भकास वनविभागाचेे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष ; पर्यावरणाची हानी



 कर्जत/प्रतिनिधी
  कर्जत तालुक्यातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. राक्षसवाडी, तळवडी, धालवडी, कुळधरण, कोपर्डी येथील जंगलात वृक्षतोडीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने वृक्षतोड वाढत चालली आहे.
 कुळधरण नजीकच्या मोतीरा तसेच कोपर्डी, धालवडी, तळवडी भागातील वाड्यावस्त्यांवर लाकडांचे मोठमोठे ढीग जमा करून ठेवलेले असल्याची माहिती समोर येत आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वनक्षेत्राकडे फिरकतच नसल्याने वृक्षतोडीत कमालीची वाढलेली दिसत आहे. त्यामुळे जंगले विरळ झालेली आहेत. सध्या मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र उजाड झाले आहे, जंगले भकास होत आहे. खैर,निलगिरी, लिंब या झाडाची सर्वाधिक कत्तल केली जाते. मोठ्या झाडांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जात आहे. काही ठिकाणी लाकडाच्या विक्रीचे प्रकारही घडत आहेत.
 सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान झाडांची तोड होते. खैर ,निलगिरी, लिंब या झाडाची मोठमोठे ओंडके या भागात साठवून ठेवले जातात. वन विभागाचे अधिकारी कामात कुचराई करत असून त्यांचे वनक्षेत्रावर नियंत्रण दिसत नाही, असा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. वृक्षतोडीमुळे जंगलातील वन्य प्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्यामुळे वन्य प्राणी सैरभैर झाले असून ते शिकारीचे बळी ठरत आहेत. वन कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त घातल्यास वन्यप्राण्याचा बचाव करता येऊ शकेल असे नागरिकांचे म्हणणे आहे.