Breaking News

राज्यात ‘करोना’चे पाच रुग्ण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


मुंबई/पुणे ः जगभरात थैमान घालणार्‍या करोना व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. सर्वप्रथम काल पुण्यात दोन रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर सायंकाळपर्यंत या विषाणुची लागण झालेले आणखी तीन जण आढळून आले. महाराष्ट्रात करोनाची बाधा झालेले आजपर्यंत पाच रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत एकूण 304 नमुने संकलित करण्यात आले आहेत, या पैकी 289 नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते निगेटिव्ह व पाच पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आणखी दहा नमुन्यांच्या तपासणीचा निकाल यायचा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 मार्चला दुबईहून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही पती-पत्नी असून दुबईहून परतल्यानंतर त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. मात्र  सर्दी आणि खोकला असल्यामुळे त्यांनी स्वत: नायडू रुग्णालयात तपासणी करुन घेतली. दुसर्‍या चाचणीत दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबईहून 1 मार्चला दुबईहून पुण्यात दाखल झाल्यापासून ही मंडळी अनेक ठिकाणी वावरली आहे. याचा विचार करुन त्यांच्या सहवासात आलेले लोक तसेच ते ज्या ग्रुपसोबत दुबईला गेले होते त्यांची माहिती काढण्याचे आदेश आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. त्यांच्या सहवासात आलेल्या सर्वांची तपासणी करुन प्रादुर्भाव टाळण्याची खबरदारी म्हणून आरोग्य मंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत. जगभरात थैमान घातेल्या कोरोना व्हायरसची लागण झालेली महाराष्ट्रातील ही पहिली केस आहे. यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही गरज नाही. होळी, धुळवज. तुकाराम बीज तसेच गावोगावी भरणार्‍या यात्रा आणि उरुसांच्या पार्श्‍वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेले आहे. तसंच कोणत्याही ठिकाणी वावरताना वैयक्तिक स्वच्छता पाळावी. तंसंच खोकताना, शिंकताना मास्क ऐवजी, रूमाल वापरावा असंही आरोग्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलं आहे. इराण, इटली आणि दक्षिण कोरियामध्ये सध्या करोनाचा उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारीनंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.  आतापर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारी पासून आतापर्यंत ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत 304 जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यापैकी 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने तपासणी निगेटिव्ह आली असून 5 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सद्याच्या घडीला पुण्यातील रुग्णालयात 12 जण तर मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात 3 जण डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502  बेडस उपलब्ध आहेत.


 
1 लाख 29 हजार 448 प्रवाशांची तपासणी
कोरोना बाधितांच्या सहवासितांचा शोध घेणे युध्दपातळीवर सुरु आहे. पुण्यातील दाम्पत्यानंतर त्यांच्यासोबत दुबईहून परतलेल्या मुलगीसह ज्या टॅक्सीने त्यांनी मुंबई-पुणे प्रवास केला तो टॅक्सीचालक आणि त्यांच्या विमानातील सहप्रवासी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. 10 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 1 हजार 101 विमानांमधील 1 लाख 29 हजार 448 प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. . . .
पहिल्या ’कोरोना’ संशियताचा मृत्यू

भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 62 वर गेला आहे. महाराष्ट्रासह राजस्थानातही कोरोनाचा पॉझिटीव रुग्ण आढळला आहे. दिल्लीनंतर आर्थिक राजधानी मुबंईतही कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. या सगळ्यानंतर आता कर्नाटकमध्ये एका 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे असा संशय होता.


 
कोरोना बाधितांची ओळख उघड करु नका

कोरोना विषाणू बाधित आणि संशयित रुग्णांची ओळख उघड करु नका, अशी विनंती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी केली आहे. पुण्यात 5 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.माध्यमांना आवाहन करताना म्हैसेकर म्हणाले की, कोरोना विषाणू बाधित किंवा संशयित रुग्ण हा काही गुन्हेगार नाही. त्यांची ओळख माध्यमांनी किंवा नागरिकांनी जाहीर करु नये. कारण त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकला जाण्याची भीती आहे. त्यामुळे तेवढी काळजी माध्यमांनीही घ्यावी.