Breaking News

साईबाबा मंदिराच्या विविध विभागात स्वच्छता विद्युत, बांधकाम, पाणीपुरवठा विभागात दुरुस्ती


शिर्डी/ प्रतिनिधी ः
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने करोना व्हायरसचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साईबाबा समाधी मंदिराच्या सर्व विभागांनी स्वच्छतेची कामे केली.
  संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी समाधी मंदिर व मंदिर परिसरात भेट देऊन स्वच्छताविषयक कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. श्री साईबाबा समाधी मंदिर कळसापासून धुवून स्वच्छ करण्यात आले. तसेच व्दारकामाई, चावडी, गुरुस्थान, हनुमान मंदिर, गणपती, शनिदेव व महादेव मंदिरांसह दर्शनरांग, प्रशासकीय इमारत, पिंपळवाडी रोडलगतचे शेड, 16 गुंठेतील सभामंडप, लेंडीबाग ही सर्व ठिकाणे धुण्यात आली.
गर्दी नसल्यामुळे या ठिकाणी विद्युत, बांधकाम, पाणी पुरवठा व मेकॅनिकल आदी विभागांनी आपल्याशी संबंधित मेंटेनन्सची कामे हाती घेतली आहेत. 
संस्थानच्या सर्वात मोठ्या साईआश्रम भक्तनिवासस्थानमध्ये पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले. संपूर्ण एक हजार 536 खोल्या, टेरेस, परिसर लिक्वीडने धुण्यात आला. तेथील चादरी, बेडशिट, उशी कव्हर आदी धुवून स्वच्छ करण्यात येत आहे. साईआश्रम परिसरातील झाडे-झुडपेही धुण्यात आली. या संपूर्ण परिसरात प्रतिबंधात्मक औषध फवारणी करण्यात येत आहे. याबरोबरच नवीन भक्त निवासस्थान 500 रुम, व्दारावती भक्त निवासस्थान, बसस्थानक येथील दोन मजले या ठिकाणीही स्वच्छता करण्यात येत आहे.