Breaking News

शिवसेना पदाधिकाऱ्या हत्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा हत्येला वाळू तस्करीचा वास? कोपरगाव / ता.प्रतिनिधी
 कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सुरेश शामराव गिऱ्हे यांची रविवारी निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी संवत्सर रामवाडी येथील संशयित आरोपी रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह अन्य अनोळखी चार अशा सहा इसमांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप फरारी असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत अशी माहिती उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
  कोपरगाव तालुक्यात सहा वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत वाळूचोरांच्या दोन टोळ्यात हाणामारी झाली होती. त्यावेळी झालेल्या बंटी शिनगर याच्या हत्येत रवी आप्पासाहेब शेटे हा एक आरोपी सामील होता. त्याचा या हत्येशी संबंध असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. या घटनेतील काही आरोपींना दहा वर्षांची शिक्षा झाली होती. तर काही आरोपी फरार झाले होते. त्यातील एक फरार आरोपी   रवी शेटेचे व सुरेश गिऱ्हे यांचे वाळू व्यवसायातून बिनसले होते व ते एकमेकांचे कट्टर वैरी झाले होते.  रवी शेटे हा अनेक दिवसापासून मयत सुरेश गिऱ्हे याच्या मागावर होता. त्यातूनच रविवार दि.१५ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घरी आला असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या काही गुन्हेगारांनी त्यास भोजडे चौकी येथील घरी गाठले व हत्या केली.
 याप्रकरणी शामराव भीमराव गिऱ्हे (वय ६१) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गु.र.नं.८८/२०२० भा.द.वि.कलम ३०२,४५२,१४३,१४७,१४८,१४९ तसेच शस्र प्रतिबंध कलम कायदा कलम ३/२५,२७,७/२५,४/२५ अन्वये रवी आप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यांच्यासह अन्य चार अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.