Breaking News

भाजपपासून वेगळा झालो, हिंदूत्वापासून नाही अयोध्येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला


अयोध्या ः मुख्यमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यादांच उद्धव ठाकरे अयोध्या दौर्‍यावर आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. मी भाजपपासून वेगळा झालो असलो तरी हिंदुत्त्वापासून नाही. हिंदुत्त्व म्हणजे भाजपची मक्तेदारी नसल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
रामलल्लाचे दर्शन घेण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.  ते पुढे म्हणाले, मी तिसर्‍यांदा अयोध्येत आलो होते. अयोध्येते येणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मी वारंवार अयोध्येत येईन. नोव्हेंबरमध्ये अयोध्येला आलो आणि नोव्हेंबरमध्येच मी मुख्यमंत्री झालो. मी स्वप्नातही याचा विचार केला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आलो होतो. त्यावेळी चांगले यश मिळाले होते. मी अयोध्येला नियमित येत राहणार आहे. मी प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद घेणार आहे.  मला शरयू नदीची आरती करण्याची इच्छा होती. परंतु, कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे तेथे आरती करता येणार नाही. पण मी पुढच्यावेळी जेव्हा येईन तेव्हा आरती करणारच असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी अयोध्येत महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारणार असल्याची घोषणा केली. यासाठी लवकरच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसेनेच्या ट्रस्टच्या वतीने अयोध्येतील राम मंदिर उभारण्यासाठी 1 कोटी देणगी देणार असल्याची घोषणाही केली. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. मी भाजपपासून वेगळा झालो असलो तरी हिंदुत्त्वापासून नाही. हिंदुत्त्व म्हणजे भाजप नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर बोलण्याचे टाळले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उत्तर प्रदेशपोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली तसेच ढोलताशांच्या गजरात व प्रचंड उत्साहाने शिवसैनिकांनी त्यांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौर्‍याची घोषणा फार पूर्वीच केली होती. परंतु महारष्ट्रातील राजकीय प्रेचप्रसंग आणि प्रशासकीय कामांमुळे हा दौरा लांबणीवर गेला होता. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत खासदार संजय राऊत, रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे, आणि शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे देखील प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.