Breaking News

करोनामुळे अमेरिका आणि स्पेनमध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर


नवी दिल्ली : जगभरात झपाट्याने पसरणार्‍या कोरोना विषाणूमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचे संकट पाहता ट्रम्प यांनी अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अमेरिकन सरकारने 50 अब्ज डॉलर्सची मदत देखील जाहीर केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाचे संकट पाहता व्हाइट हाऊसमध्ये तातडीची पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. याआधी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्पेनने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ’आपल्याला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. हात त्याग आपल्याला भविष्यात फायदेशीर ठरेल. पुढचे आठ आठवडे अत्यंत कठीण आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 1100हून जास्त नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून 40 लोकांचा मृत्यू झाला, असल्याचे त्यांनी सांगितले. तसंच, कोरोनाने अमेरिकेसारख्या विकसित देशासमोर मोठे आव्हाण निर्माण केले आहे. प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत कोरोनाचा सामना करण्यासाठी आणि तपासणीची उपलब्धता सुनिश्‍चित करण्यासाठी अनेक महत्वपूर्ण पाऊलं उचलली आहेत, असे देखील त्यांनी सांगितले. अमेरिकेतील सर्व राज्यांना कोरोनाचा सामना करण्यासाठी आपत्कालीन ऑपरेशन सेंटर तात्काळ सुरू करण्याचे आदेश ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, अमेरिकेत कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण खूपच कमी आहे. परंतू प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत आहे आणि त्यावर उपाय म्हणून सर्व शक्य तेवढ्या उपाययोजना करीत आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसंच, अमेरिकेतील सर्व शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक ठिकाणे बंद केली जात आहेत, असे देखील त्यांनी सांगितले.