Breaking News

कोरोनाची वाढती दहशत !

कोराना व्हायरसची चीनमध्येच नाही, तर जगभरात दहशत वाढली आहे. कोरोना व्हायरसवर अजूनही लस शोधण्यात यश आलेले नाही. त्यातच रुग्णांची आणि मृत्यू होणार्‍यांची संख्या झपाटयाने वाढत चालली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगभरात 57 देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची लागण झाली असून, 85,000 प्रकरणे समोर आली आहेत. कोरोना विषाणूंमुळे 3800 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गजन्य रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही प्रचंड आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या विषाणूबाबत पहिल्यांदा कळले होते. आता तीन महिन्यांचा कालावधीनंतर या कोरोनाची लागण झालेले रुग्ण झपाटयाने वाढत चालले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, याची लागण हवेतून होते. भारतात देखील या रुग्णांची संख्या जवळपास 42-43 पर्यंत पोहचली आहे. दिल्लीत 31 मार्चपर्यंत शाळांना सुटी देण्या आली आहे. तसेच सार्वजनिक रित्या होणारे कार्यक्रम टाळण्याची गरज आहे. सार्वजनिक रित्या होणार्‍या क्रीडा स्पर्धांना बे्रक लागला आहे. कोरोनामुळे व्यापार आणि उद्योगधंद्यावर मोठा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता, सध्या कोरोना व्हायरसची जगभर दहशत आहे. जिथे जाल तिथे कोरोनाची चर्चा आहे. गर्दीत जायला लोक घाबरतात. होळीत रंग खेळावा की नाही याची चिंता लागली आहे. पंतप्रधान मोदींनी तर यावेळी आपण होळी खेळणार नाही असे जाहीर करून टाकल्याने पूर्ण देश टेन्शनमध्ये आला आहे. 78 दिवसांपूर्वी चीनमधून सुरूवात झालेल्या ह्या आजाराने सर्वांना घाबरवून सोडले आहे. चीनमध्ये कोरोनाने तीन हजार बळी घेतले, इटलीमध्ये 107 मेले. हे दोन देश सोडले तर कोरोनाने मेलेल्यांचा कुठे मोठा आकडा नाही. पण दहशत मोठी आहे.
आपल्या भारतात आतापर्यंत फक्त 29 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोना जीवघेणा असल्याने काळजी घेतलीच पाहिजे. आपल्या सरकारने त्याला रोखण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला आहे. साथीचे आजार जगाला नवे नाहीत. 2003 साली ‘सार्स’ नावाच्या व्हायरसने 26 देशात थैमान घातले होते. 2009 मध्ये आलेल्या स्वाईन फ्ल्यूने भारतातही धुमाकूळ घातला होता. 2014 मध्ये आलेल्या ‘इबोला’च्या तडाख्यात 11 हजार लोक मृत्युमुखी पडले होते. सध्या कोरोनाच्या तडाख्यात चीन सापडला आहे. हा संसर्गजन्य असल्याने सारे जग तणावात आले आहे. चीनचीच नव्हे तर जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. कोरोना जीवघेणा आहे. पण खरेच त्याला एवढे घाबरण्याची गरज आहे का? त्याची भीती फुगवून दाखवली जाते आहे का? काळजी घेतली तर कोरोनाला रोखले जाऊ शकते. स्पर्शाने कोरोना पसरतो. त्यामुळे हस्तांदोलन करू नका असे सांगितले जात आहे. भारतीय पद्धतीच्या ‘नमस्कारा’चे महात्म्य ह्या निमित्ताने जगाला कळत आहे. आजाराच्या साथी पूर्वीही होत्या. कॉलरा, प्लेगच्या साथींनी हजारो माणसे मृत्युमुखी पडली. ठराविक भागातच त्याची दहशत असे. आज काळ बदलला. सोशल मीडियाने जग लहान झाले आहे. 2003 साली ‘सार्स’ आला तेव्हा फेसबुक किंवा व्हॉट्सअप नव्हते. त्यामुळे तेवढी घबराट नव्हती. स्वाईन फ्ल्यू आला तेव्हा फेसबुकवर फक्त दीड कोटी लोक होते. इबोला आला तेव्हा हा आकडा साडे चार कोटीवर गेला होता.
आज दोन अब्ज लोक व्हॉट्सअप वापरतात. दीड अब्ज लोक फेसबुकवर आहेत. सोशल मीडियाच्या ह्या शक्तीमुळे कोरोनाची भयावहता आहे त्यापेक्षा वाढून पहायला मिळते आहे. कोरोना असो की दिल्लीतली दंगल, सोशल मीडियामुळे ते सारे आपल्या घरात सुरू आहे असे वाटते. आठ दिवसापासून निव्वळ कोरोनाची चर्चा आहे. भारतात ‘कोरोना’ व्हायरस दिवसेंदिवस हातपाय पसरत चालला आहे. कारण केरळमध्ये कोरोनाचे आणखी पाच आणि तामिळनाडूमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला आहे. केरळमधील एकाच कुटुंबातील तिघांसह पाच जणांना कोरोनोची लागण झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी दिली. या पाच जणांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 वर पोहोचली आहे. कोरोनाची लागण झालेल्या या कुटुंबातील तीन जण नुकतेच इटलीहून भारतात परतले होते. इटलीहून परतल्यानंतर त्यांनी आपल्या काही नातेवाईकांची भेट घेतली. त्यामुळे या तिघांच्या संपर्कात आलेल्या आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे कोरोनोबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या पाच जणांमध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्या व्यतिरिक्त ईराणहून परतलेल्या लडाखच्या दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अशा प्रकारे गेल्या 24 तासांच्या कालावधीत कोरोनाचे 8 नवे रुग्ण आढळले होते. यापूर्वी 2008 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर असाच घसरला होता. चीनमध्ये कोरोनामुळे घटलेल्या औद्योगिक उत्पादनाचा फटका आशियाला मोठया प्रमाणावर बसला असल्याकडे ओईसीडीनं लक्ष वेधलं आहे. कोरोना आणि जागतिक मंदीची दखल भारतीय रिझव्र्ह बँकेलाही घ्यावी लागली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गृहबांधणी क्षेत्राला मंदीच्या या वातावरणाचा आणखी फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. नागरिकांना घर खरेदीकडे वळवायचं असेल, तर गृहकर्जावरील व्याजदर आणखी कमी करावे लागतील, असं सूतोवाच त्यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या साथीच्या जागतिक तसंच देशांतर्गत परिणामांवर भारतीय रिझव्र्ह बँक बारकाईने नजर ठेवून आहे.