Breaking News

सोन्याच्या दराने गाठला उच्चांक

गुढीपाडव्यापर्यंत पन्नाशी गाठण्याची शक्यता 
नवी दिल्ली : सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किंमतीने आजपर्यंतचा सर्वात मोठा रेकॉर्ड केला आहे. सोनांचा सर्वात जास्त दर आजचा असून 44 हजार 920 रुपये तोळा इतके जास्त सोने महागले आहे. त्यामुळे सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या खरेदी क्षमतेच्या बाहेर गेले आहेत.
एकीकडे आज पेट्रोल - डिझेलचे दर कमी झाले असताना आज दुसरीकडे सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. इतकेच नाही तर 25 मार्चला गुढीपाडव्यापर्यंत सोन्याचे दर 50 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सध्या जगभरात कोरोना व्हायरसचे सावट आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर आणि आयात निर्यातीवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. दुसरीकडे शेअर बाजार कोसळत आहे. या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. हिंदु सणांमध्ये गुढीपाडवा हा मराठी नव वर्षांची सुरुवात समजली जाते आणि हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी सोनं खरेदीची प्रथा आहे. परंतु सोन्याच्या वाढत्या किंमती पाहता येत्या गुढीपाडव्याला सर्वसामान्यांच्या सोनं खरेदीवर संक्रात येण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घसरणं झाली होती. सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या दरात घट झाली होती. मागणी घटल्याने देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. त्यामुळे दिल्ली सराफ बाजारात सोनं तब्बल 396 रुपयांनी स्वस्त झालं होतं. चांदीच्या किंमतीत देखील घट पाहायला मिळाली होती. चांदी प्रति किलो 179 रुपयांनी स्वस्त झाली होती. परंतु आता सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.