Breaking News

दारुभट्टीवर छापा, सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त


पारनेर/प्रतिनिधी ः
शिरुर हद्दीलगत गुणवरे परिसरात दारुच्या हातभट्टीवर टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी दोन लाख 42 हजारांचे दारुचे रसायन, दारु आणि साहित्य जप्त केले.
पारनेर तालुक्यातील शिरूर व पारनेर सीमाभागावर कुकडी नदीपात्राच्या परिसरात झाडीमध्ये गावठी दारू तयार केली जात होती.  ही माहिती पारनेरचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना समजताच त्यांनी पथकासह या भागामध्ये छापा टाकला. पोलिस पथकाची चाहूल लागल्यामुळे प्रकाश सुरेश पवार (राहणार म्हसे बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) हा पळून गेला. पोलिसांनी यावेळी दारुचे 400 लीटर रसायन, 175 लीटर गावठी दारू आणि दारूभट्टीचे साहित्य जप्त केले. दोन लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा हा माल आहे. पोलिसांनी रासायनिक परीक्षणासाठी सॅम्पल राखून ठेवले आहे. इतर सर्व साठा जागीच नष्ट करून त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. हातभट्टीचालकावर पारनेर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.