Breaking News

आनंदऋषीजी हॉस्पिटलने आजार प्रतिबंधासाठीही जनजागृती करावी : फिरोदिया किडनी विकार शिबिराला मोठा प्रतिसाद


अहमदनगर / प्रतिनिधी :
आचार्यश्रींच्या मानवसेवेची शिकवण तंतोतंत अंमलात आणत आनंदऋषीजी हॉस्पिटलने रूग्णांना वेदनामुक्त करण्याचा वसा घेतला आहे. आचार्यश्रींचे नाव असलेल्या हॉस्पिटलमध्ये एक प्रकारचे पवित्र वातावरण अनुभवता येत असल्याने रूग्णाचा निम्मा आजार पळून जातो. राज्यात तसेच देशात नावलौकिक प्राप्त केलेल्या हॉस्पिटलमध्ये उच्च दर्जाचे उपचार अतिशय नाममात्र दरात उपलब्ध आहेत. सर्वोत्तम उपचार आणि अतिशय कमी उपचार खर्च याची सांगड घातल्यामुळे सर्वसामान्यांना खूप दिलासा मिळतो. दरवर्षी आचार्यश्रींच्या जयंती, पुण्यतिथीला याठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येतात. त्या जोडीलाच आता आजार प्रतिबंधासाठीही व्यापक जनजागृती मोहिम हाती घेण्यात यावी, असे आवाहन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.
राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज यांच्या २९ व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त आणि जागतिक किडनी रोग दिनानिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत किडनी विकार तपासणी शिबिर घेण्यात आले. शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचे उद्घाटन नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी  माणिक पब्लिक ट्रस्टचे आनंदऋषीजी हॉस्पिटल डायलिसिस विभागाचे आधारस्तंभ प्रकाश मुनोत, उद्योगपती अशोक पारख, गौरव भंडारी, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, संतोष बोथरा, शिबिरातील तज्ज्ञ डॉ. गोविंद कासट, डॉ. स्वागत ससाणे, डॉ. गजेंद्र गिरी आणि जैन सोशल फेडरेशनचे सभासद उपस्थित होते. प्रास्ताविक  डॉ. प्रकाश कांकरिया यांनी केले. प्रकाश छल्लानी यांनी डायलिसिस विभागाची माहिती दिली. दरम्यान, शुक्रवारी दि.१३ मार्च रोजी त्वचा रोग तपासणी शिबीर होणार आहे. यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. भास्कर पालवे, डॉ. अमित शिंदे रुग्णांची तपासणी मार्गदर्शन करतील.