Breaking News

‘करोना’ला रोखण्यासाठी पूर्वकाळजी घ्यावी : जिल्हाधिकारी


अहमदनगर/ प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने पावले उचलली असून नागरिकांनी घाबरुन न जाता पूर्वकाळजी घ्यावी व राज्यशासन आणि जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे आणि या आपत्तीचा एकजुटीने सामना करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. 
दरम्यान, जिल्हा रुग्णालय येथे कोरोना आजारासंबंधित 27 जणांची तपासणी करण्यात आली. यातील सात रुग्ण हे बाहेरील देशातून परत आलेले आहेत तर वीस रुग्ण हे स्वत:हून तपासणीसाठी दवाखान्यात दाखल झाले होते. यापैकी दोन जण संशयित वाटल्याने त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्था अर्थात एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात आले तसेच या रुग्णांना देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित तपासणीसाठी आलेल्या नागरिकांवर औषधोपचार करुन घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली.
आज तपासणीसाठी दाखल झालेल्या एकूण 27 रुग्णांमध्ये 17 पुरुष तर 10 महिलांचा समावेश होता. परदेशातून आलेल्या सात नागरिकांपैकी चार जण दुबई, एक जण यूएसए, एक जर्मनी तर एक जण इंग्लंडहून आला आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात होत असलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. परदेशात कामानिमित्त किंवा सहलीसाठी जाऊन आलेल्या नागरिकांनी त्यांच्या जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा रुग्णालयात त्यांची तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. त्याला प्रतिसाद देत या नागरिकांनी स्वत:ची तपासणी करुन घेतली. ंकरोना विषयक शंका-समाधानासाठी टोल फ्री 104 क्रमांक उपलब्ध करण्यात आला आहे.  याशिवाय  जिल्हा सामान्य रुग्णालय, अहमदनगर येथे करोना नियंत्रण कक्ष स्थापन (0241-2431018) करण्यात आला असून तो 24 तास कार्यरत आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा 1077 या टोल फ्री क्रमांकावरुन नागरिकांना मूलभूत माहिती दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.