Breaking News

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना अटक मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीची कारवाई


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रविवारी पहाटे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडशी (डीएचएफएल) निगडीत मनी लाँड्रिंग प्रकरणी येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना अटक केली आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी त्यांची सुमारे 30 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. राणा कपूर यांना रविवारी सकाळी सुमारे 11 वाजता न्यायालयात सादर केले जाणार आहे.
ईडीने वरळीतील राणा कपूर यांच्या समुद्र महल निवासस्थानी तपास सुरु ठेवला होता. येस बँकेचे प्रमोटर राणा कपूर आणि त्यांच्या दोन मुलींची बनावट कंपनी अर्बन व्हेंचर्सला घोटाळेबाजांकडून 600 कोटी रुपये मिळाल्याचा तपास ईडी करत आहे. भ्रष्टाचारात सामील असलेल्या डीएचएफएलने बँकेकडून मिळालेल्या 4450 कोटी रुपयांसाठी या कंपनीला पैसे दिले होते. त्याचा तपास केला जात होता. ईडीच्या अधिकार्‍यांनी म्हटले की, येस बँकेने डीएचएफएलला 3750 कोटी रुपयांचे कर्ज आणि डीएचएफएलद्वारा नियंत्रित कंपनी आरकेडब्ल्यू डेव्हपर्सला 750 कोटी रुपयांचे आणखी एक कर्ज दिले होते. अधिकार्‍यांच्या मते, जेव्हा या दोन कंपन्यांनी कर्जाची परतफेड केली नाही. तेव्हाही येस बँकेने कारवाई सुरु केली नाही. कारवाई होऊ नये म्हणून डीएचएफएलकडून कपूर यांनी पैसे घेतल्याचा संशय आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राणा कपूर यांची चौकशी सुरु केली होती. शनिवारी सकाळपर्यंत ही चौकशी सुरु होती. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास पुढील चौकशीसाठी त्यांना ईडीच्या बलार्ड इस्टेट येथील कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना रविवारी पहाटे 3 वाजता अटक करण्यात आली. ईडीच्या अधिकार्‍यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये त्यांच्यी तीन मुली आणि प्रभादेवी येथील येस बँकेच्या मुख्यालयाचीही चौकशी केली. मुलींचा जबाब नोंदवला जाईल आणि कपूर कुटुंबीयांच्या आर्थिक देवाण-घेवाणीचीही चौकशी केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. येस बँकेने व्होडाफोन, डीएचएफएल, एस्सेल आणि अनिल अंबानी समूहासारख्या संकटग्रस्त कंपन्यांना कर्ज दिले आहे.
आर्थिक संकटात असलेल्या येस बँकेने आर्थिकदृष्टया सक्षम पुर्नउभारी घेण्याबाबतचा विश्‍वासार्ह आराखडा सादर न केल्याने बँकेविरुद्ध आरबीआयने कारवाई केली होती. या कारवाईमुळे अर्थविश्‍वात खळबळ उडाली. सरकारच्या मंजुरीनंतर येस बँकेवर प्रशासकही नियुक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर बँकेतील संशयित घोटाळ्याचा तपास ईडीने तातडीनं स्वत:कडे घेतला होता. कारवाईचे आदेश येताच राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल या घरावर छापा टाकण्यात आला. कपूर यांनी प्रामुख्याने काही वित्त तंत्रज्ञान कंपन्यांना नियमबाह्य कर्ज दिले व त्यासाठी विदेशी चलन वापरले. ही कर्जे थकीत झाली व त्यामुळेच बँक संकटात आली, या संशयावरुन ईडीने हा छापा टाकला होता. त्यानंतर 30 तासाच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.