Breaking News

कोपरगावमध्ये चार तास जनता दरबार पाणी पुरवठा, शाळा खोल्यांच्या समस्या मांडल्या


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी ः
येथील पंचायत समिती कार्यालयात झालेल्या जनता दरबारात नागरिकांनी अनेक तक्रारी मांडल्या. त्यापैकी 10 तक्रारी जागेवरच सोडवण्यात आल्या. चार तास या जनता दरबारात चर्चा झाली. 
गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी जनता दरबार घेतला.
सर्वसामान्य लोकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी गटविकास अधिकारी यांनी जनता दरबार आयोजित करावा, अशा सूचना राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिल्या होत्या.
त्यानुसार जनता दरबार घेण्यात आला. शुक्रवारी सकाळी 11 वाजता सुरु झालेल्या जनता दरबारात पहिल्या एक तासात नागरिकांची संख्या कमी होती. त्यानंतर अनेक जणांनी घरकुल, गावठाण जागेवरील अतिक्रमणे, पाणी पुरवठा, शाळा खोल्या, गावातील सांडपाणी अशा समस्या काही नागरिक लेखी तर काही तोंडी मांडत होते.
सभागृहातच प्रत्येक विभागाचा टेबल व विभागप्रमुख उपस्थित होते.
 आलेले तक्रार अर्ज त्या त्या विभागाकडे पाठवत जागेवरच निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
गटविकास अधिकारी सोनकुसळे म्हणाले, लोकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन ते सुटावेत यासाठी जनतादरबार घेतला आहे. या जनतादरबारात आलेल्या अर्जाची संख्या व त्यावर केलेली कार्यवाही याबाबत लेखी स्वरुपात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल पाठवणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पंचायत समिती येथे जनतादरबाराचे आयोजन केले आहे. तालुक्यातील नागरिकांनी आपल्या काही समस्या असेल तर मांडाव्यात. त्यांचे निराकरण केले जाईल, असेही सोनकुसळे यांनी सांगितले.
जनतादरबार दुपारी तीन वाजेपर्यंत चालला. पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, पंचायत समितीचे सदस्य मधुकर टेके, अनुसया होन, सुनीता संवत्सरकर, सोनाली साबळे, बाळासाहेब राहाणे, वर्षा दाणे, चांगदेव माळी, मढी खुर्दच्या सरपंच वैशाली आभाळे, कक्ष अधिकारी डी. एस. गायकवाड, आर. पी. डोंगरे, डॉ. दिलीप दहे, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, उपअभियंता यू. सी. पवार, डॉ. बडदे यावेळी उपस्थित होते.