Breaking News

टँकरच्या मागणीसाठी गावकारभाऱ्यांचेच उपोषण


 जामखेड/प्रतिनिधी
 जामखेड तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील दहा गावात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीपुरवठा योजना कोरडय़ा ठाक पडल्या आहेत. प्रशासनाला याबाबत महिनाभरापासून टँकरची मागणी केली आहे. तसेच वरीष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने पाणी उपलब्ध नसल्याचे दाखले दिले तरी कर्जत उपविभागीय अधिकारी यांनी टँकरचे प्रस्ताव फेटाळले आहेत. टँकर सुुुुरू करण्याच्या मागणीसाठी पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांच्या नेतृत्वाखाली दहा गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी गुरूवारी जामखेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपोषण केले.
  पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे म्हणाले, जवळा गटातील दहा गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी टंचाई शाखेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली होती. तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटातील पिंपरखेड, हळगाव, अरणगाव, फक्राबाद, डोणगाव, धानोरा, बावी व चोंडी गावात मागील वर्षी झालेल्या पावसाळ्यात अवघा १८२ मि. मि. पाऊस पडला आहे. याची शासन दप्तरी नोंद आहे. कमी पाऊस असल्यामुळे या परिसरातील फळबागाला टँकरने पाणीपुरवठा शेतकरी करित आहे. चोंडी बंधारा कोरडेठाक पाडल्यामुळे या बंधाऱ्यावरून पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना कोरडय़ा ठाक पडल्या आहेत. याबाबत प्रांत कार्यालयाला प्रस्ताव पाठवून ही त्याची दखल न घेता अजून टंचाई जाहीर झाली नाही असे प्रांतकडून उत्तर दिले जात असल्याचे पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे यांनी सांगितले. तसेच कुकडीचे चालू आवर्तनात चोंडी बंधा-यात पाणी सोडल्यास सात गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो असे सरपंच ढवळे म्हणाले.
 माजी पंचायत समिती सभापती डॉ. भगवान मुरूमकर, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी उपोषणस्थळी भेट दिली. पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, उपसरपंच शहाजी म्हस्के, प्रा अरूण वराट, ग्रामपंचायत सदस्य राजू ओमासे, फैयाज शेख, बाबासाहेब ढवळे, बापू शिंदे, संतोष कारंडे, राहुल चोरगे, बाळू कारंडे, भागवत ओमासे, शहाजी आधुरे, अरणगावचे सरपंच लहू शिंदे, धानोरा सरपंच बाळासाहेब तुपेरे, फक्राबाद सरपंच विश्वनाथ राऊत आदी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपोषणास बसले होते. दरम्यान सायंकाळी ४ च्या सुमारास गटविकास अधिकारी परशुराम कोकणी तसेच नायब तहसीलदार यांनी अंदोलकांशी यशस्वी चर्चा केली. टँकरचे प्रस्ताव तातडीने पाठवण्यात येतील असे लेखी अश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले.