Breaking News

‘करोना’चे वाढते भय !

करोना विषाणूमुळे जगभरात खळबळ माजली असून, यावर उपाययोजना करण्यात येत असल्या, तरी या संसर्गजन्य रोगांवर अजूनही कोणत्याही प्रकारची लस शोधण्यात यश आलेले नाही. भारतात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांपेक्षा ती सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. भारताकडून गांभीर्यांने उपाययोजना करण्यात येत असल्यामुळे पुढील काही दिवसांत करोनाची साथ आटोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी पुढील पंधरा दिवस भारतासाठी आव्हानात्मक असल्याचे दिसून येत आहे. 
  चीनमध्ये करोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी होतांना दिसून येत आहे. मात्र इराण, इराक, स्पेन, फ्रान्स या देशात या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढतांना दिसून येत आहे. करोना विषाणू चीनमध्ये पसरल्यानंतर जगभरात या संसर्गजन्य रोगाला ज्या गांभीर्यांने घ्यायला पाहिजे, होते, त्या गांभीर्यांने घेतले नाही. परिणामी करोनाच्या रुग्णांत सातत्याने वाढ होतांना दिसून आली. अमेरिका, जपान, यासारख्या प्रगत देशात देखील करोनाने आपले बस्तान बसवले आहे. करोनाच्या धास्तीमुळे भारतातील विविध राज्यात 31 मार्चपर्यंत शाळा, सिनमागृहे, व्यायामशाळा, तलाव, नाटयगृहे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. भारतात देखील जर करोनाला लवकरात लवकर पायबंद करायचा असेल, तर सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे टाळण्याची गरज आहे. शक्यतो घरी बसूनच, आपले कामकाज करण्याला नागरिकांनी सध्यातरी प्राधान्य देण्याची गरज आहे. पुढील दोन आठवडयात जर नवीन रुग्ण आढळले नाही, तर करोनाला आळा घालता येईल. राज्यातील करोना रुग्णांची संख्या 33 वर गेली असून मुंबईसह महानगर परिसरात लोकांसाठी दिलासा देण्याची बाब म्हणजे येथे  रविवारी एका ही नव्या संशयित रुग्णाची नोंद झालेली नाही. कस्तुरबा रुग्णालयात 43 जणांची करोना चाचणी झाली मात्र त्यांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
पुणे परिसरात कोरोनो बाधित 16 रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने अनेक निर्बंध लागू केले आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, ओपन पार्क बंद करण्यात आले असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरु राहतील, असे राज्यसरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळायला हवी.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (पंढरपूर), सिद्धिविनायक (मुंबई), महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), ज्योतिबा देवस्थान (वाडी रत्नागिरी), अंबाबाई देवस्थान (तुळजापूर) येथील गर्दी ओरसली असून, करोनोच्या संसर्गाच्या भीतीने साधी सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनी दवाखान्यात धाव घेतली असल्याने रुग्णालयात गर्दी होतांना दिसून येत आहे. या साथीशी संबंधित पहिला रुग्ण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आढळला. 8 जानेवारीला या साथीचा कारक कोरोना विषाणू असल्याची खात्री झाली. 8 मार्च 2020पर्यंत या साथीची लागण जगभरात 1,05,586 जणांना झाली असून या साथीचे मृत्यू 4,027 इतके झाले आहेत. चीनमधील हुबेई प्रांतात उद्भवलेला हा संसर्गजन्य रोग 100 देशांच्या सीमा ओलांडून गेला आहे. भारतामध्ये केरळमध्ये या कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा उपाय म्हणजे हात स्वच्छ धुणे. चेहरा आणि डोळे यांना हाताने स्पर्श न करणे. फ्लू आणि कोरोनाव्हायरस यापासून वाचण्याचा सध्या हा एकच प्रतिबंधक उपाय आहे. विषाणू हवेतील सूक्ष्म कणातून पसरतात. श्‍वसनमार्गात असे सूक्ष्म कण आल्यास श्‍वसनमार्गाच्या पेशीमध्ये त्यांची वाढ होते. त्यासाठी चेहर्‍यावर मास्क लावणे हॉस्पिटल कर्मचार्‍यांसाठी अत्यावश्यक ठरले आहे.
गर्दीच्या ठिकाणी प्रवास करायचा असल्यास तोंडावर स्वच्छ रुमाल बांधणे पुरेसे आहे. लोकल, बस , सिनेमागृहे, यात्रा शक्यतो टाळा. स्वत:च्या वाहनातून प्रवास करताना वाहने स्वच्छ ठेवा. भरपूर पाण्याने व साबणाने हात धुवा. साबण जंतुनाशकच हवा असा आग्रह नाही. दरवर्षी संशोधक फ्लू प्रतिबंधक लस विकसित करत असतात. पण आज  कोरोनाव्हायरसवर प्रतिबंधक अशी लस उपलब्ध नाही. नजीकच्या काळात ती तयार होण्यासाठी मानवी प्रयत्नांची पराकाष्ठा व संशोधनावरील निधी त्यावर हे अवलंबून आहे. एकदा लस तयार झाली तरी त्याच्या प्राण्यावर आणि मानवी चाचण्या होईपर्यंत दुसरा विषाणू मानवी संसर्गाची वाट पाहात असतो. त्यामुळे अद्याप करोना विषाणूवर लसची निर्मिती झालेली नाही. त्यादिशेने संशोधकांचे संशोधन सुरु आहे. त्यांना लवकर त्यात यश मिळेल. मात्र आता सध्यातरी फक्त उपाययोजना करण्यावर भर देण्याची खरी गरज आहे. भारतात वाढत्या शहरांमध्ये आणि निमशहरी भागांत अनेकदा रुग्णालये अपुरी पडत असल्याचे, सरकारी पाहणीत वारंवार समोर आले आहे. त्यातही संसर्गजन्य आजारांचा सामना करण्याची क्षमता असलेली रुग्णालये अगदी हाताच्या बोटावर मोजता यावीत एवढी कमी आहेत. मुंबईचे कस्तुरबा रुग्णालय, पुण्याचे नायडू रुग्णालय अशा मोजक्याच रुग्णालयांत सध्या संशयित रुग्णांच्या विलगीकरणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. शहरांची वाढती लोकसंख्या पाहता मोठ्या शहरात एखादेच विशेष रुग्णालय हे पुरेसे ठरत नाही. आपल्याकडे अशी संसर्गजन्य आजारांची विशेष संकल्पनात्मक रुग्णालये आहेत, ती ब्रिटीश काळात उदयास आली. पण आता मुंबई, पुणे आणि नागपूरची लोकसंख्या वाढली आहे. त्या प्रमाणात नवी रुग्णालये तयार करण्याची आवश्यकता आहे.