Breaking News

राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त गृह, आरोग्य विभागात सर्वाधिक जागा


मुंबई : राज्यातच नव्हे तर देशभरात रोजगार भरती सरकारकडून करण्यात आलेली नाही. किंवा ज्या वेगाने ती व्हायला पाहिजे, त्या वेगान होतांना दिसून येत नाही. आर्थिक मंदीच्या फेर्‍याबरोबरच महाराष्ट्र कर्जाच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त असतांना देखील भरती मोठया प्रमाणांवर होत नसल्याचे दिसून येत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारकडे राज्यातल्या जिल्हा परिषदा आणि विविध शासकीय विभागांमध्ये किती पदे रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. राज्य सरकारने नितीन यादव यांना काल ही माहिती इमेल द्वारे दिली. ह्या माहिती मध्ये 31 डिसेंबर 2019 अखेर किती पदे रिक्त आहेत याचा तपशील देण्यात आला आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विभाग आणि जिल्हा परिषदा मिळून 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. सरळसेवा, पदोन्नती मिळून वेगवेगळ्या विभागासाठी 10 लाख 91 हजार 104 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 8 लाख 98 हजार 911 पदे भरली गेली आहेत. उर्वरीत मंजुर पदाची भरती न झाल्यामुळे 2 लाख 193 पदे रिक्त आहेत. रिक्त पदामध्ये विविध महामंडळं जसं की खादी ग्राम उद्योग एसटी महामंडळ याचा समावेश नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असतानाही राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये नोकरभरती केलेली नाही. त्याहीआधी भरती झाली नव्हती. पुढची मेगाभरती केव्हा होईल याची खात्री नाही. परंतु दोन लाख पदे रिक्त असल्याची माहिती पहिल्यांदाच समोर आल्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर अतिरिक्त पदांचा किती ताण पडतोय हे चित्र बाहेर आलो आहे. माहिती अधिकारात सर्वच विभागांमध्ये या रिक्त पदांची माहिती देण्यात आलेली आहे. राज्यात दोन लाख जागां रिक्त असतांना, ही भरती कधी होणार असा प्रश्‍न निर्माण होतांना दिसून येत आहे.