Breaking News

राम मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवा : मागणी


भिंगार / प्रतिनिधी
भिंगारमध्ये प्रत्येक शुक्रवारी मोठ्या प्रमाणात बाजार भरतो. भिंगार शहर, बारा बाभळी, केकती, नागरदेवळे, बुऱ्हाणनगर आणि मिलिटरी मधील सैनिकांचे कुटुंबीय बाजारात खरेदीसाठी येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो. भिंगार शहरालगत खेडेगावातून शेतकरीवर्ग भाजीपाला विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाने  राम मंदिर परिसरात  पेव्हिंग ब्लॉक बसवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमध्ये सुरू आहे.
नगरच्या मंगळवारच्या बाजारासारखाच शुक्रवारी भिंगारला मोठ्या प्रमाणात मच्छी विक्री बाजारही भिंगारला भरत असतो. पूर्वी शुक्रवार बाजार हा शुक्रवार बाजार मैदानात भरत असे. आता तिथे लोकसंख्येमध्ये वाढ झाल्यामुळे आणि दुकानांची गर्दी झाल्यामुळे बाजारासाठी जागा कमी पडू लागल्यामुळे भिंगारमध्ये शुक्रवारी भरणारा  बाजार राममंदिर परिसरात भरविण्यास सुरुवात केली आहे. राम मंदिर, हनुमान मंदिर आणि जैन धर्माचे, जैन स्थानक असून तेथे नागरिकांची भाविकांची वर्दळ कायम सुरू असते. राजकीय सभा घेण्यासाठी ही ते पटांगण सोयीचे  आहे. पटांगणात माती असल्यामुळे पावसाळ्यात पाणी झाल्यामुळे तिथे चिखल होतो तर उन्हाळ्यात वाऱ्यामुळे माती उडून भाजीपाल्यावर माती भरून भाजीपाला खराब होऊन त्याचा नागरिकांना त्रास होतो. त्यामुळे अस्वच्छता पसरते. मागील पावसात दिवाळीच्या वेळेस फटाक्यांची दुकाने लावली जातात. याठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्डाला नेहमी मुरुम टाकावा लागल्याचे उदाहरण ताजे आहे. राम मंदिर परिसरात भरणाऱ्या बाजारातून कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्रत्येक आठवडा चांगल्या प्रकारे महसूली उत्पन्न मिळत असल्यामुळे जर पटांगणात पेविंग ब्लॉक बसवले तर पटांगणात स्वच्छता राहील. दुकानदार   नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या मागणीचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाने राम मंदिर परिसरात  नागरिकांच्या सोयीसाठी पेव्हिंग ब्लॉक बसवावेत, अशी अपेक्षा भिंगार भाजपचे माजी शहराध्यक्शि वाजी दहीहंडे यांनी व्यक्त केली आहे. तर या परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने पाठपुरावा करणार आहोत, असे भिंगार शहर शिवसेनेचे अध्यक्ष सुनिल लालबोंद्रे यांनी सांगितले.