Breaking News

रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहन मालकांविरोधात होणार गुन्हे दाखल


मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागी किंवा रस्त्यावर सोडून दिलेल्या वाहनांमुळे रहदारीला अडथळा होण्यासोबतच सुरक्षेचा प्रश्‍नही निर्माण होतो. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू - मलेरियाचा प्रसार करणा-या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन या प्रकारे सोडून दिलेल्या वाहनांबाबत राज्य शासनाचे परिवहन आयुक्तालय व आर.टी.ओ. यांच्या सहकार्याने मोहिम स्वरुपात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या अनुषंगाने सोडून दिलेली वाहने जप्त करुन ती ठेवता यावीत, यासाठी तळोजा परिसरातील एका भूखंडावर व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात नुकत्याच झालेल्या एका विशेष बैठकीदरम्यान निर्णय घेण्यात आला आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूक अधिकाधिक सुलभ व वेगवान व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सातत्याने सर्वस्तरीय प्रयत्न करत असते. याच प्रयत्नांचा भाग म्हणून रस्त्यावर सोडून दिलेली व वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने उचलण्यात येतात. मात्र, सदर वाहनांच्या मालकांविरुद्ध आजवर कोणतीही ठोस अशी कारवाई केली जात नव्हती. हे लक्षात घेता अत्यंत बेजबाबदारपणे रस्त्यावर वाहने सोडून देणा-या वाहन मालकांविरोधात मुंबई पोलीस, परिवहन आयुक्तालय, वाहतूक पोलीस, आर.टी. ओ. यांच्या सहकार्याने गुन्हे दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वरीलनुसार रस्त्यांवर सोडून दिलेली वाहने आढळल्यास ती जप्त करुन तळोजा येथे नेण्यात येतील. त्यानंतर सदर वाहनांच्या ’नंबरप्लेट’ वर नमूद केलेल्या वाहनक्रमांकाआधारे वाहन मालकांचा शोध घेतला जाईल. ’नंबरप्लेट’ नसल्यास किंवा नंबर वाचनीय नसल्यास ’वाहन चॅसिस’ क्रमांकाच्या आधारे आणि आर.टी.ओ. च्या सहकार्याने वाहन मालकाचा शोध घेऊन त्यांच्या पत्त्यावर दंड आकारणी करण्याबाबत नोटीस पाठवण्यात येईल. नोटीशीत नमूद केलेल्या मुदतीमध्ये दंड जमा करुन वाहन घेऊन न गेल्यास संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच सदर जप्त केलेले वाहन हे भंगार म्हणून लिलावात विकण्यात येईल, असा निर्णय नुकत्याच झालेल्या संयुक्त बैठकीदरम्यान घेण्यात आला आहे. यानुसार रस्त्यांवर सोडून दिलेल्या वाहनांच्या विरोधात मोहिम स्वरुपात कार्यवाही सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन खात्याला व विभागस्तरीय सहाय्यक आयुक्तानां दिले आहेत.