Breaking News

प्रांताधिकाऱ्यांचा पोल्ट्री असोसिएशनकडून निषेध पोल्ट्रीधारकांना अरेरावीची भाषा ; शेतकरी संतप्त


 कर्जत /प्रतिनिधी
 कोरोना विषाणूची भीती, सोशल मीडीयावरील अफवा, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती आदींचा फटका पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना बसत आहे. या प्रश्नावर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या पोल्ट्री व्यवसायिकांना कार्यालयाबाहेर काढून अरेरावीची भाषा वापरल्याबद्दल कर्जत तालुका पोल्ट्री फार्म असोसिएशनकडून प्रांताधिकारी यांचा निषेध करण्यात आला. तहसील कार्यालयासमोर येऊन पोल्ट्री धारकांनी प्रांताधिकाऱ्यांचा निषेध करून नायब तहसीलदार यांना निवेदन दिले.
 जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोल्ट्री धारकांच्या आर्थिक नुकसानीबाबत निवेदन देण्यासाठी गेलो असता प्रांताधिकारी यांनी अरेरावीची भाषा वापरून त्यांच्या कार्यालयाबाहेर काढले. प्रांताधिकारी यांनी दिलेल्या वागणुकीचा असोसिएशनकडून निषेध करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करून प्रांताधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. कारवाई झाल्यास कर्जत तालुक्यातील सर्व पोल्ट्रीधारक आपल्या कोंबड्या प्रांताधिकारी यांच्या केबिनमध्ये सोडून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
 निवेदनावर पोल्ट्री असोसिएशनचे भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, भूषण शिंदे, सुधीर गुंड, अमोल सुपेकर, फैयाज शेख, रियाज सय्यद, अनिल बागल, ओंकार लांगोरे, तुषार धांडे, ऋषिकेश सावंत, सुनील निकत, विलास राऊत, सुजित डाळिंबकर, बापू कदम, समीर बागवान, नवनाथ कांबळे, संतोष शेळके, रोहन केंदळे, राजाराम तोरडमल, दीपक सरोदे, जब्बारखान पठाण, हारूण शेख, उस्मान शेख, सलमान पठाण, चांद शेख, इम्रान सय्यद, किरण साळुंखे, विलास गांगर्डे आदींच्या सह्या आहेत.


पोल्ट्रीधारकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी लोकशाही मार्गाने कार्यालयात गेलो होतो. मात्र प्रांताधिकार्यांनी कार्यालयाच्या दारात येताच अरेरावीची भाषा वापरून कार्यालय बाहेर जाण्यास सांगितले. जनतेचे सेवक असलेल्या अधिकाऱ्यांना जर एवढी गुर्मी असेल तर पुढील काळात त्यांची गुर्मी उतरवण्याचे काम करावे लागेल.

- भास्कर भैलुमे,
पोल्ट्री व्यवसायिक, कर्जत