Breaking News

कोरोना! भय इथले संपत नाही! 'मास्क विक्री'त काहींनी छापले करोडो!


संभाव्य मृत्युच्या भीतीने कोणताही माणूस अर्धमेला होतो, या अनुभवाचा गैरफायदा कसा घ्यायचा, हे काही कोणाला शिकविण्याची गरज राहिलेली नाही. विशेष म्हणजे यासाठी कोणतेही प्रशिक्षण न घेताच अनेकजण आजमितीला कोरोना व्हायरसची भिती दाखवून करोडो रुपये छापत आहेत. हे सांगण्याचे कारण एकच, की स्टर्लाईज अर्थात विषाणूमुक्त केलेले कापडी मास्क पूर्वी पाच ते सात रुपयांना विकत मिळायचे. मात्र कोरोनाची भीती दाखवून हे मास्क आता काहींनी चक्क दीडशे रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत विकण्याचा प्रताप केला आहे. अर्थात यामध्ये उच्च दर्जाचे मास्क थेट पाचशे रुपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. यातून करोडो छापण्याचा गोरखधंदा खुलेआम सुरु आहे.
समजा, एखाद्या महाभागाने दोनशे रुपये दराने एक लाख मास्क विकले, तर तब्बल २ कोटी रुपये होतात. एक मास्क तयार करण्यासाठी येणारा खर्च आणि जास्तीत जास्त प्रमाणात विकत दिलेले मास्क तसेच त्यात संबंधिताला राहणारे मार्जिन अर्थात नफा हा कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. म्हणूनच सामान्य माणसांना मृत्यूची भिती दाखवून करोडो रुपये कमविणे हे आपल्या नेहमीच्या भाषेत सांगायचे झाल्यास 'मढ्याच्या टाळूवरचे लोणी' खाण्यासारखे आहे. पैसे कशात कमवावे, आणि कसे कमवावे, हा नीतिमत्तेचा एक भाग आहे. मात्र 'कंबरेचे सोडून डोक्याला बांधणाऱ्यां'विषयी काय बोलायचे, हा खरा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आता हे कापडी मास्क वापरल्यानंतर ते सुयोग्य पद्धतीने 'डिस्पोजल' होतात, याची काय खात्री? हे मास्क मोकाट जनावरांच्या संपर्कात आले तर त्या मुक्या जित्राबांना कोरोना होणार नाही, हे कशावरून? प्रत्येकाच्या घरात लहान मुले असतात. एखादा वापरलेला किंवा व्यवस्थित 'डिस्पोजल' न झालेला मास्क यातील लहान मुलांच्या हातात संपर्कात आला, तर त्यांना या कोरोनाची बाधा होईल, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरजच काय? राहिला प्रश्न, कोरोना आजारापासून होणाऱ्या संभाव्य मृत्यूचा. तर विज्ञान आणि अध्यात्मानुसार ज्याचा जन्म झाला, त्याचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे येणारच आहे. मग कोरोना आजाराने येणाऱ्या मृत्यूची एवढी भिती का दाखविली जातेय, यामध्ये सरकारी यंत्रणा तर सहभागी नाहीत ना? आणि एवढा सारा गोंधळ सुरु असताना देशाचे विरोधी पक्षनेते काय करताहेत, या प्रश्नांची उत्तरे खऱ्या अर्थाने सामान्यांना शोधावी लागणार आहेत.
'त्या' शाळांवर कोण आणि कधी कारवाई करणार?
महिला अत्याचार किंवा प्रतिष्ठित व्यक्तीला मारहाण झाली, समाजावर अन्याय झाला, तर सामाजिक संघटना पेटून उठतात. रस्त्यावर उतरून आंदोलने करतात. अर्थात याची गरज आहेच. पण मग कोरोना आजाराच्या या एवढ्या प्रचंड धुमाकुळातही शहरातील सामाजिक संघटनांच्यावतीने मोफत मास्क का वाटण्यात आले नाही? या आजाराला घाबरून न जाता कशी काळजी घ्यावी, याविषयी एखाद्या सामाजिक संघटनेने प्रबोधन का केले नाहीत? सामाजिक संघटना आणि त्यांचे पदाधिकारी म्हणत असतील, की गर्दी करण्यावर सरकारी बंधन आहे. ठीक आहे, आजमितीला गर्दी करणे बेकायदेशीर आहे. मात्र शाळा आणि महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला या सामाजिक कार्यकर्त्यांना कोणी अडवलंय का? आणि मुख्य म्हणजे एकीकडे शाळा बंद ठेवण्याचे आदेश असताना खासगी शाळा तर या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. त्या शाळांविरुद्ध कोण आणि कधी कारवाई करणार?