Breaking News

रस्त्याने जाणार्‍या तरुणाला लागली गोळी चौघांच्या वादादरम्यान गोळीबार


पारनेर/ प्रतिनिधी ः
तालुक्यात गुणवरे परिसरामध्ये रस्त्यात भांडणे सुरू असताना तिथून जात असलेल्या मोटारसायकलस्वाराला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.
संजय बाळू पवार (वय 23, राहणार राळेगण थेरपाळ, पारनेर ) असे जखमीचे नाव आहे.
गुरुवारी (दि.5) सकाळी दहाच्या सुमारास गुणवरे ते शिणगरवाडी रस्त्याच्या कडेला एका ओढ्याजवळ चौघांची भांडणे सुरू होती. त्याच वेळी  राळेगण थेरपाळ येथील संजय पवार हे टाकळी हाजीकडे दुचाकीवरून निघाले होते. कोणाची भांडणे चालली आहेत हे पहाण्यासाठी तो दुचाकी सावकाश चालवत होता. त्याचवेळी भांडण करणार्‍यांपैकी एकाने आपल्याजवळील गावठी कट्ट्यातून एक गोळी झाडली. ही गोळी नेमकी भांडणे सुरू असलेल्यांपैकी कोणालाच न लागता दुचाकीवरील पवार यांच्या हाताला लागली.
पवार यांना गोळी लागताच त्या चौघांनी तेथून पळ काढला. पवार यांच्या हाताला गोळी चाटून गेली मात्र तिचा काही भाग हातात शिरला. जखमी पवार यांस पुढील उपचारासाठी शिरूर येथे हलवले. तेथे त्याच्या हातातील गोळी चा काही भाग काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे करत आहेत.