Breaking News

शाळांनी वातावरण दूषित करु नये

अहमदनगर / प्रतिनिधी : ‘आपल्याला करोनाची लागण नाही’ असे लेखी पत्र शहरातील काही शाळांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरांकडून आणण्यासाठी बंधनकारक केले असून या प्रकारामुळे शहरातील वातावरण दूषित झाले आहे. त्यामुळे शाळांनी शहरातील वातावरण बिघडवू नये, असे प्रतिपादन डॉ. अशरफी यांनी केले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण जगामध्ये करोना व्हायरसबाबत भीतीचे वातावरण असून भारतातही व्हायरसचे रुग्ण दिसत आहे. पुण्यासारख्या शहरात करोनाचे रुग्ण आढळल्याने जवळच असलेल्या अहमदनगर शहरातही भीतीचे वातावरण तयार झाले आहे. त्यात काही शाळांनी सर्व विद्यार्थ्यांना ‘आपण करोना बाधित नाही’ असे पत्र आपल्या डॉक्टरकडून आणायला सांगितले. अशा प्रकारचे पत्र बंधनकारक केल्याने डॉक्टरांकडे लेखी पत्र घेण्यासाठी रांग लागली आहे. पालकांना विचारणा केली असता असे समजले की,  शाळेने डॉक्टरांकडून लेखीपत्र आणणे बंधनकारक केले असून जर असे पत्र आणले नाही तर शाळेत बसू देणार नाही. या सर्व बाबीवरून असे दिसते की शाळा संपूर्ण शहराचे वातावरण दूषित करीत आहे. ज्यामुळे सामान्य पालकांचे हाल होत आहे आणि आपले सर्व काम सोडून पत्र आण्यासाठी पळत आहे. आणि विशेष म्हणजे कोणताही वैद्यकीय अधिकारी कोणतीही तपासणी न करता असे  पत्र देऊ शकत नाही यामुळे पालकांची फजिती होत आहे.
 याबाबत एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर जिल्हा महासचिव हाजी जावेद शेख, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक आसिफ सुलतान, शाहनवाज तांबोळी, बाळासाहेब मिसळ, कदीर शेख, अमीर खान, फिरोज शेख, आरीफ सय्यद, डॉ ननावरे यांची स्वाक्षरी आहे.