Breaking News

राज्यात पेट्रोल, डिझेल एक रुपयाने महागणार


मुंबई ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडला. यावेळी हरित निधी उभा करण्यासाठी राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार लावण्याचा प्रस्ताव त्यांनी अर्थसंकल्पात मांडला. यामुळे पुढील आर्थिक वर्षापासून राज्यात पेट्रोल आणि डिझेल एक रुपयांनी महागणार आहे. जागतिक तापमान वाढ हा सध्या जगापुढील सर्वांत मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे त्यावर उपाय योजणे सगळ्यांसाठी आवश्यक आहे. याच उपाययोजनांसाठी हरित निधी उभा करण्याचे सरकारने ठरविले आहे. या निधीसाठी राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया अतिरिक्त अधिभार आकारण्यात येणार आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एक रुपयाने वाढणार आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विधानभवनामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी पेट्रोल आणि डिझेलवर एक रुपया अतिरिक्त अधिभार आकारण्याचे समर्थन केले आहे. अजित पवार म्हणाले, आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यात आपल्यापेक्षा पेट्रोल, डिझेल महाग आहे. तेथील सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी अधिभार लावला म्हणून आम्ही लावत नाही. हरित निधी उभा करणे ही काळाची गरज आहे.