Breaking News

राज्यातील चार शहरे आजपासून बंद जीवनावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद


मुंबई ः मुंबईतील लोकल आणि बस सेवा बंद होणार नाही. जीवनावश्यक वस्तूं व्यतिरिक्त इतर दुकानं आणि कार्यालये बंद राहतील. येत्या 31 मार्चपर्यंत ही बंदी असणार आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या शहरासाठी हे नियम राहतील. मुंबईतील सर्व खासगी कंपन्यांची कार्यालय बंद ठेवावी. पुढचे 15 दिवस सर्वांना खबरदारी घ्यावी लागणार आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यात वेगाने पसरणार्‍या कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितले की, कोरोनाविरोधात जागतिक युध्द सुरु झाले आहे.  सध्या कोणतेही शस्त्र या लढाईत वापरण्यासारखे नाही. संपूर्ण जग जगण्यासाठी एक सेकंदही न थांबता धावपळ करत असते. मात्र आता संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात थांबण्याची वेळ आली आहे. तसंच, सरकारकडून सांगितलेल्या नियमांचे नागरिकांकडून पालन होत आहे. मुंबईकरांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील गर्दीमध्ये फरक पडला आहे यापुढे देखील असेच सहकार्य करावे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, मुंबईतील रेल्वे आणि बस बंद करा असे अनेकांनी सांगितले होते. मात्र रेल्वे-बस सेवा बंद केल्या तर अत्यावश्यक सेवा खोळंबतील. त्यामुळे मुंबईत तूर्त लोकल आणि बस सेवा बंद होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारनं शासकीय कर्मचारी 50 टक्क्यांवर आणले होते. हे प्रमाण सरकारनं आणखी कमी केलं आहे. आता 25 टक्के कर्मचार्‍यांवर शासकीय कार्यालयं चालतील. खाजगी क्षेत्रातही तसं आवाहन केलं आहे. त्याला प्रतिसाद मिळाला आहे. पण, काही ठिकाणी अजूनही ऑफिसमध्ये काम होत आहेत. जर हे बंद केलं जात नसेल, तर सरकारला बंद करावं लागेल,’ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सरकारनं केलेल्या आवाहनाला जनतेनं प्रतिसाद दिला आहे. मात्र, अजूनही मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. कारण सध्या तरी संपर्क आणि संसर्ग टाळण्याशिवाय काहीही पर्याय नाही, असं ठाकरे म्हणाले.