Breaking News

श्रीगोंद्यात अवकाळी पावसाने पिकांची नासाडी रब्बी पिकांसोबत फळबागांचे नुकसान कोळगाव प्रतिनिधी :
 श्रीगोंदा शहर परिसर तालुक्याच्या काही भागात मंगळवारी रात्री ते वाजेच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसासाचे प्रमाण जरी जास्त नसले तरी शेतामध्ये उभ्या असणाऱ्या पिकांची नासाडी झाली आहे.
 मागील दोन दिवसांपासून अचानक वातावरणातील उष्णता वाढून आभाळ दिसू लागले आहे. मंगळवारी रात्री ते वाजेच्या सुमारास अचानक जोराचा वारा वाहून परिसरात मोठे मोठे थेंब पडू लागल्याने शेतकऱ्यांची दानादान उडाली. सध्या रब्बी हंगामाच्या गहू, हरभरा तृणधान्य पिकांची काढणी, मळणीची कामे शेतात सुरु आहेत. तर काही ठिकाणी शेतात गहू, कांदा, हरभऱ्याची पिके काढून शेतातच पडून आहेत. त्यामुळे हातात आलेले पीक अवकाळी पावसाने जाते की काय अशी चिंता शेतकर्र्यांना लागली आहे.
 त्याचप्रमाणे तालुक्यात द्राक्षे, डाळिंब, चिकू,पेरूच्या फळबागा मोठ्या प्रमाणात लगडलेल्या आहेत. आधीच यावर्षी आंब्याला मोहोर कमी आहे त्यात अवकाळीच्या शक्यतेने आंबा ही दुर्मिळ होतो की काय अशी भिती भेडसावत आहे. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे आधीच बळीराजाचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. मात्र समाधान यातच की सध्या पिके जोमाने बहरली आहेत. जर अस्मानी संकट पुन्हा आले तर पुन्हा शेतकरी कर्जाच्या खाईत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.