Breaking News

शेतकरी हाच केंद्रबिदू ः अजित पवार


मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुतळ्याला पुष्पहार घालून, वंदन करुन मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पास विधानसभेत प्रवेश केला. यंदाच्या अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारने शेतकरी हाच केंद्रबिंदू ठेवल्याचं दिसून येत आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पासंदर्भात भूमिका मांडली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्याच्या विकासासाठी महाविकास आघाडीचं सरकार कटिबद्ध आहे. हेच उद्दिष्ट ठेवून अर्थसंकल्प मांडला आहे,’ असं पवार म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘कोणत्याही सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प चांगला असतो. कारण, फक्त घोषणा करायच्या असतात. पण, आम्ही सगळा समतोल साधण्याचा प्रयत्न केला. राज्याच्या तिजोरीवर सातव्या वेतन आयोगाचा भार आहे. कर्मचार्‍यांना आयोग द्यावा लागणारच होता. हा भार पेलतानाच सगळ्यांनाच सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. दरम्यान, ‘आधीच्या फडणवीस सरकारने शेतकरी कर्जमाफी केली. मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या. तब्बल 26 वेळा कर्जमाफीच्या आदेशात बदल करण्यात आले. त्यामुळे शेतकरी गोंधळून गेले होते. दररोज नवनवीन आदेश येत होते. तसेच भाजपने केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया दीड वर्षे नव्हे तर सरकार जाईपर्यंत सुरू होती, असा टोला उपमुख्यमंत्री पवार यांनी लागवला.