Breaking News

अत्यावश्यक सेवा वगळता कर्जतमध्ये कडकडीत बंद


कर्जत / प्रतिनिधी ः
करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जाहीर केलेल्या बंदला कर्जतमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. कर्जतमध्ये शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला.
करोना विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. याचा फैलाव होऊ नये, तसेच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने प्रथमच जनतेच्या हितासाठी हा बंदचा निर्णय घेतला आहे. 20 मार्च ते 31 मार्चपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.
गुरुवारी जिल्हाधिकारी यांनी बंदचा आदेश काढताच प्रशासनाने सतर्कता दाखवली. कर्जत नगरपंचायतीने भोंगा देऊन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नगरपंचायत प्रशासन, पदाधिकारी, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सातव, तहसीलदार छगन वाघ, पोलिस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने यांनी बंदचे आवाहन केले. त्याला कर्जत शहरासह तालुक्यातून व्यापारी बांधवांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. कर्जत, राशीन, मिरजगाव, कुळधरण, माहिजळगाव आदी भागातही बंद पाळण्यात आला.