Breaking News

महिला आणि त्यांची मानसिकता


भारताच्या विषमता वादी व्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी व महिलांना अज्ञाना कडून विज्ञानाकडे नेण्यासाठी महिलांनी अनेक हाल अपेष्टा सहन करून सामाजिक क्रांती घडवून आणली. अनेक महिलांच्या त्याग व संघर्षा मुळे भारतीय महिला बोलू लागल्या, चालु लागल्या एवढेच काय तर स्रि / महिला म्हणून जगु लागल्या. भारताची संस्कृती व संस्कार जगामध्ये चांगले आहेत असे सांगितले जाते. जागतिक महिला दिन ईतर देशांच्या मानाने आपण सुद्धा चांगल्या प्रकारे साजरा केला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन अनेक ठिकाणी महिलांचा सत्कार करण्यात आला. महिलांचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करुन महिलांच्या सुप्त गुणांना समोर आणण्याचे काम देखील या दिवशी करण्यात आले. महिला सक्षम, निर्भीड, व कर्तृत्व वान असुन संस्कार क्षम समाजाची निर्मिती एक महिलाच करु शकते. याची जाणीव वारंवार करून देण्यात आली. एक महिला जागृत झाली तर एक आदर्श समाज व्यवस्था निर्माण होते. जिवनामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच शिवाय स्त्रि शिवाय घर, संस्कार, व समाजाची पुर्तता होऊच शकत नाही. स्त्रि समाजाचा अविभाज्य घटक आहे अशा प्रकारच्या शब्दांमध्ये स्त्रिचे वर्णन करून जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करण्याचा बेगडी प्रयत्न प्रत्येकांनेच केलेला आहे. तसही आपण जे काही करायचे ते बेगडीच करतोय. मनलाऊन कोणतीच गोष्ट भारतात केली जात नाही याची परिचिती अनेक वेळा येतेच. जागतिक महिला दिन महिलांच्या सन्मानासाठी केला जातो म्हणून भारतीय खरचं किती महिलांनी या दिवसाला गांभीर्य घेतले? काही अपवादात्मक कार्यक्रम व महिला वगळता महिला दिनाचा स्पर्श सुद्धा महिलांना झाला नाही. खुप कमी महिलांनी जागतिक महिला दिनांचा वैचारिक आनंद लुटला. जागतिक महिला दिनी महिलांंचे कर्तृत्व, नेतृत्वाचे गोडवे ऐकतानाच दुसरा दिवस उजाडला तो होळीचा.
दिवसभर महिलांचे गुणगान ऐकताना मन भारावून गेलेले असताना एकदम दिवस उगवला तो होळीका दहण करण्याचा. ज्यांनी जागतिक महिला दिन साजरा केला, ज्यांचा जागतिक महिला दिनी आदर्श व कर्तृत्व वाण महिला म्हणून सन्मान करण्यात आला त्याच महिलांना नटून थटून होळीका या महिलेला स्वतः च्या हाताने जाळताना बघितले. एकिकडे जागतिक महिला दिन साजरा करुन महिलांचा सन्मान करायचा आणि त्याच महिलांनी होळीका ला स्वतः च्या हाताने जाळायचे ते पण उत्सव साजरा करून. नेमके आम्ही संस्कार जपतो तरी कोणते? आणि कोणाचे? जगाची निर्मिती असलेली एक स्त्रि स्त्रिलाच प्रतिकात्मक जाळते यामागचे नेमके कारण तरी काय? जगाची जननी, असलेली स्त्रि एकदम जगाची एवढी शत्रु कधी झाली कि स्त्रिचे चौकाचौकात दहण करण्यात येते. एका स्त्रिला जाळून त्याचा उत्सव साजरा करताना महिलांच्या डोक्यात साधाही प्रश्‍न येऊ नये म्हणजे नवलच. होळीका मध्ये असा कोणता वाईट गुण होता कि ज्या गुणांमुळे तिला अर्थात स्त्रिला जाळावे लागले? खरच स्त्रिला स्त्रिनेच जाळावे एवढी वाईट स्त्रि आहे? स्त्रियांविषयी लावलेल्या प्रथा परंपरा वाईट आहेत? प्रथा परंपरा वाईट असतील तर शिक्षणाचा व डोक्यात असलेल्या मेंदुचा वापर करायचा कधी? वाईट रुढी परंपरा  झुकारण्याची आपल्यात क्षमता नसने म्हणजे आपण माणसिक गुलाम आहोत हे सिद्ध होते. खर्‍याचा स्विकार करून वैचारिक व विज्ञानवादी रहाने यालाच शिक्षण म्हणतात. जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान करायचा आणि होळीका दहण करताना महिलेला जाळायचे हे ना तत्वात बसत ना विचारात बसत. काही लोक व महिला म्हणतात होळी जाळणे म्हणजे वाईट विचार, वाईट गुण जाळणे होय. असे म्हणणे सुद्धा स्वतः ची फसवणूक करून मानसिक गुलामगिरी मजबूत करणे होय. जर होळीकेच्या नावाने वाईट विचार व गुणांचे दहण केल्या जाते तर बलात्कार करणार्‍या भोंदूबाबाला वाचवण्यासाठी महिला रस्त्यावर येतात, देशात बॉम्बस्फोट घडलणार्‍या स्त्रिला संसदेत पाठवतात, देशातील सर्वात मोठी दरोडेखोर एका छताखाली बसून देशाचे शोषण करतात हे वाईट नाही का? जर हे वाईट असेल तर हे का जाळले जात नाही? बलात्कारी, भ्रष्टाचारी आरामात जिवन जगत आहेत आणि निष्पाप महिलांना भर दिवसा जाळले जात असताना प्रस्थापित व्यवस्था फक्त बोंबलत आहे. आणि या बोंबलण्या मुळे पिडीतेचा आवाजच दाबल्या जात आहे. म्हणून तर निर्दोष होळीकेला जाळताना तिचा आवाज लोकांपर्यंत जाऊच नये म्हणून तर या महिन्याला बोंबचा महिना म्हणत असतील. किती विरोधाभास या ठिकाणी आपणास दिसतो. एक दिवस महिलांचा सन्मान करायचा तर दुसर्‍या दिवशी महिलेला महिलेच्या हातानेच जाळायचे. नेमके यातून आपण काय साध्य करणार आहेत हेच निश्‍चित नाही.
जागतिक महिला दिवस साजरा करायला मोजक्याच महिला असतात त्यातही काही महिलांना गांभीर्य नसते. होळी जाळताना सर्वच महिला नटुन थटून आपल्याच हाताने महिलेला जाळतात. होळीका या महिलेला जाळण्यासाठी सर्वच महिला तत्पर असतात. पण या दोन्ही ठिकाणच्या महिला एक गोष्ट पुर्ण पणे विसरून जातात ती म्हणजे जागतिक महिला दिन, होळी या सोबतच एक असा दिवस आहे तो दिवस म्हणजे दहा मार्च सावित्रीमाई फुले यांचा स्मृतीदिन. या दिनांचा विसर सर्वच महिलांना पडला, सावित्रीमाई सोबत प्रामाणिक असलेल्या महिलांचा आकडा बोटावर मोजण्या ईतकाच दिसतो. सावित्रीमाई फुलेंनी स्वतः ला जाळून घेतले म्हणून आज महिलांच्या जिवनात स्वातंत्र्य व आनंदाचे रंग दिसत आहेत. महिलांना मानवी, सामाजिक व शैक्षणिक स्वातंत्र्य देणार्‍या सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेसमोर एकही फुल वाहण्याची आठवण महिलांना राहिली नाही उलट सावित्रीमाई च्या संघर्षातुन मिळालेल्या मानवी स्वातंत्र्याचा वापर चुकिच्या पद्धतीने करताना दिसत आहेत. होळीकाला जाळताना आपल्याला पुरूषांसोबत बरोबरीने उभे राहण्याचा अधिकार मिळवून देणार्‍या सावित्रीमाई चा स्मृती दिन, महिलांना आठवू नये, काही महिलांना सावात्रीमाई फुलेंचा स्मृतीदिन आठवून सुद्धा सावित्रीमाईला वंदन करू नये म्हणजे हि सावित्रीमाई शी केलेली बेईमानी होणार नाही का? महिलांची माणसिकता आजही कुठे आहे याचा शोध घेणे आजही आवश्यक आहे. अंगावर चांगले कपडे आले, चार वर्ग शाळा शिकले म्हणजे आपण सुशिक्षित झालो असे होत नाही सुशिक्षित तोच होतो ज्याला दुरदृष्टी निर्माण होते, सत्य असत्यामधला फरक कळुन सत्याचा स्विकार म्हणजे शिक्षण, अज्ञानाला मातीत घालून विज्ञानाचा पुरस्कार म्हणजे शिक्षण होय. पण आजही महिला अज्ञान व अंधश्रद्धे मध्ये डुबलेल्या आहेत. आणि अंधश्रद्धेचे पोषण करून त्यालाच संस्कृती म्हणून स्विकारीत आहेत. असे चित्र भारतात आजही आहे, काय खावे काय फेकावे यामधला फरक अजूनही कळत नाही. दुध दगडावर टाकले जाते व टाकाऊ पदार्थ पिले जातात याला नेमके काय म्हणावं. महिलेचा सन्मान करायचा आणि होळीकेच्या नावाने चौकात जाळायचे. आजही महिलांची हि परिस्थिती व मानसिकता आहे. विज्ञानवादी बनण्यासाठी सावित्रीमाई एकमेव मुख्य मार्गदर्शक व शिक्षिका आहेत. सावित्रीमाईच्या विचाराने जर महिला चालली तर महिला सक्षम, विज्ञानवादी तर होईलच पण खर्‍या अर्थाने महिला हि मानवाचे जिवन उपभोगु शकेल. हातात मोबाईल घेऊन त्याच मोबाईल वर हा मँसेज पाच लोकांना पाठवा म्हणजे चांगली बातमी ऐकायला मिळेल अशा प्रकारचीं माहिती पसरवणे म्हणजे आपण विज्ञानाच्या युगातही अज्ञानात आहोत याची ती पावतीच आहे.
विनोद सदावर्ते