Breaking News

भिंगारचा पाणीपुरवठा विस्कळीत ; नागरिकांत नाराजी


भिंगार / प्रतिनिधी
शहरात पाच दिवसांपासून पिण्याचे पाणीपुरवठा नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. जरी नगर परिसरात पाऊस कमी पडला असला तरी नगर आणि भिंगार शहराला मुळा धरण येथून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असूनही पाणीपुरवठा का होत नाही, याबाबत  नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
नगर शहरापेक्षा भिंगार शहरातील नागरिकांना पाण्याची पट्टी जादा दराने आकारण्यात येते. तरीही भिंगारचे नागरिक पाण्याची अवाजवी पाणीपट्टी निमूटपणे भरतात. एवढे असूनही पाच  दिवसापासून पाणीपुरवठा  बंद आहे. मुळा धरणातून पाणी एम. आय. डी. सी. कडे येते व एमआयडीसीकडून भिंगार शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होतो. भिंगार शहराला पिण्याचे पाणीपुरवठा ऐन होळी व धुलिवंदन सणाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. याबाबत सर्वपक्षीय भिंगारकर नागरिक पाणीपुरवठा व्यवस्थित नियमित न झाल्यास भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे  चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर विदयाधर पवार यांना पाणी प्रश्नावर घेराव घालण्याच्या तयारीत आहेत.  कॅन्टोन्मेंट बोर्डाने याची दखल घेऊन सणासुदीला नागरिकांची गैरसोय करू नये, अशी अपेक्षा भिंगारकर नागरिक ठेवून आहेत. भिंगार शहराला पाणी पुरवठा करणारी  डीएसपी चौक रोडवरील पाईपलाईन फुटल्यामुळे तेथे दुरुस्तीचे काम सुरु आहे. लवकरच दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन भिंगार शहराला पाणीपुरवठा व्यवस्थित केला जाईल, महेंद्र सोनवणी, अभियंता, कॅन्टोन्मेंट बोर्ड, अहमदनगर.