Breaking News

सांस्कृतिक कार्यक्रमांमधून चांगले कलाकार निर्माण होतील : राजश्री घुले

अहमदनगर/ प्रतिनिधी : “जिल्हा परिषदेच्या शाळेमधून परिपूर्ण विद्यार्थी घडतात. प्राथमिक शाळा क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुणवत्ता या सर्वच बाबतीत अग्रेसर करण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांकडून राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उ पक्रम कौतुकास्पद आहे. त्याच पद्धतीने शाळा खोल्यांची बांधकाम दर्जेदार होण्यासाठी शिक्षकांनी लक्ष द्यावे. सांस्कृतिक स्पर्धा उपक्रमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळण्यास मदत होते. जिल्ह्याला अनेक गुणी कलाकारांची परंपरा असून अशा कार्यक्रमातून भविष्यातही आणखी उत्तम कलाकार उदयास येतील’’, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
शहरातील टिळक रोडवरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षा घुले बोलत होत्या.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, उपमुख्य कार्यकरी अधिकारी वासुदेव सोळंके,  शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, उपशिक्षणाधिकारी अरूण धामणे, कांतीलाल ढवळे, अभय वाव्हळ, उर्मिला लोटके, समीर वाघमारे, मनीषा कुलट, सोन्याबापू ठोकळ आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर म्हणाले, “शालेय जीवन म्हणजे केवळ अभ्यास नसते. या वयातच मुलांची सर्वांगीण जडणघडण होत असते. प्रत्येकाच्या अंगात असलेल्या सुप्त गुणांना शालेयदशेतच वाव मिळाला पाहिजे. अशा स्पर्धातून निश्‍चितच चांगले विद्यार्थी घडतील.’’
प्रास्ताविकात रमाकांत काठमोरे म्हणाले, “केंद्र, तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांमधून उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे. यात पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दोन्ही गटांचे प्रत्येकी चौदा असे एकूण 28 संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.’’
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कारासह विविध कलागुण सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. ग्रामीण भागात असलेली गुणवत्ता यानिमित्त सर्वांनी अनुभवली. उत्कृष्ट कार्यक्रमांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.