Breaking News

बायोमेट्रिकबाबत दुकानदार,लाभार्थ्यांमध्ये संभ्रम

भिंगार : करोनामुळे बायोमेट्रिक पद्धतीबाबत जिल्ह्यातील व नगर शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून करोना व्हायरसचा पूर्णपणे बंदोबस्त होईपर्यंत स्वस्त धान्य घेताना बायोमेट्रिक पद्धत तात्पुरती बंद करावी, याची दखल जिल्हाधिकारी राहुल दिृवेदी व जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी  यांनी घेऊन तसे आदेश स्वस्त धान्य दुकानदारांना द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिल्ह्यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाने मंजूर केलेल्या स्वस्त धान्य दुकानांची संख्या 1 हजार 883 असून अंत्योदय शिधापत्रिकांची संख्या 88 हजार 72  तर प्राधान्यक्रम शिधापत्रिकांची संख्या 5 लाख 88 हजार 607 आहे. एकूण 6 लाख 76 हजार 679 शिधापत्रिकाधारकांना निश्‍चित करण्यात आलेले नियतन धान्य वितरीत केले जाते. त्यापैकी नगर  शहरात एकूण 91 स्वस्त धान्य दुकाने व नगर तालुक्यात 124 स्वस्त धान्य दुकाने आहेत. स्वस्त धान्य दुकानातील गैरकारभार थांबावा व व्यवहारात पारदर्शकता यावी यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना बायोमेट्रिक थंब पद्धतीचा वापर करण्याचे आदेश दिले होते व त्याप्रमाणे कामकाज सुरळीत चालू आहे. परंतु करोना आजाराचे भय जनतेमध्ये पसरले असल्याने बायोमेट्रिक पद्धतीमुळे धान्य वितरण करण्यासाठी लाभार्थी अंगठा  देण्यास टाळाटाळ करीत आहे. अशा अडचणी सध्या स्वस्त धान्य वाटप प्रक्रियेत होत असून  जोपर्यंत करोना आजाराची भीती संपत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप  रजिस्टर वर करण्यास शासनाने परवानगी देण्यास हरकत नाही.
करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने जिल्हा परिषद, नगरपालिका,  शासकीय कर्मचार्‍यांचे व शासकीय ऑफिसमधील शासकीय कर्मचार्‍यांचे बायोमेट्रिक थंब प्रक्रिया बंद केलेल्या आहेत. व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक वितरण व्यवस्था जुन्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे लाभार्थ्यांना धान्य वितरण व्यवस्था करावी जेणेकरून स्वस्त धान्य दुकानात गर्दी होणार नाही व करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होणार नाही. तरी वरील बाबींचा गांभिर्याने विचार प्रशासनाने करून बायोमेट्रिक पद्धत तात्पुरती बंद करणे गरजेचे आहे व त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व स्वस्त धान्य लाभार्थी यांच्यामध्ये असलेली संभ्रमता  दूर होण्यास मदत होऊन स्वस्त धान्य वितरण व्यवस्था व्यवस्थित सुरू राहील.