Breaking News

जुन्या पेन्शनवरुन सत्ताधार्‍यांचा घुमजाव : बोडखे


अहमदनगर / प्रतिनिधी
सत्तेत येण्यापूर्वी जुनी पेन्शन बाजूच्या समर्थनार्थ बोलणार्या सध्याच्या सत्ताधार्यांनी जुन्या पेन्शन विषयावर घुमजाव केल्याने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पेन्शन बचाव कृती समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुनी पेन्शनबाबत शासनाचे धोरण अन्यायकारक असून, जुनी पेन्शनसाठी पुन्हा आक्रमक पवित्रा घेणार असून, आमदारांची पेन्शन सुध्दा बंद करण्याची मागणी कृती समितीचे राज्य संयोजक संजय येवतकर यांनी केली असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र शासनाने जुनी पेन्शन योजना दि. ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळाचा निर्णय घेऊन बंद करून अन्याय केला आहे. नुकतेच उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या वेळी आता जुनी पेन्शन योजना लागू करता येत नसल्याचे वक्तव्य करुन जुन्या पेन्शसाठी आशा असणार्या कर्मचार्यांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पेन्शन बचाव कृती समितीचे राज्य संयोजक येवतकर यांनी केला आहे. तर महाराष्ट्रातील सर्व आमदारांना दिली जाणारी पेन्शन बंद करण्याचा निर्णय सुद्धा घ्यायला पाहिजे. तर आमदारांनी कर्मचार्यांवर करण्यात येणार्या अत्याचाराच्या विरुद्ध आपली पेन्शन सोडण्याची आग्रही मागणी लाऊन धरली आहे. दरम्यान, एमईपीएसचा विचार करता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांवर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे. शासनाने नेमलेल्या समितीचा अहवाल मे महिन्यात येणार असून या अहवालामध्ये कोणत्या सूचना केल्या आहेत, हे बघून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची पेन्शन बचाव कृती समितीच्यावतीने राज्य संयोजक संजय येवतकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील लढा तीव्र केला जाणार असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली.