Breaking News

येस बँकेवरील निर्बंध तीन दिवसांत हटणार बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला केंद्र सरकारची मंजुरी


नवी दिल्ली ः आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने लावलेले निर्बंध मागे घेण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलले असून, पुढील तीन दिवसांत हे निर्बंध मागे घेणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली. सध्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादले असून ग्राहकांना त्यांच्या खात्यातील 50 हजारांपर्यंतचीच रक्कम काढता येत आहेत. ही पुनर्बांधणी योजना लागू होण्याच्या तारेखपासून पुढील तीन दिवसांमध्ये येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येतील, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यापूर्वी येस बँकेच्या ग्राहकांना इंटरनेट बँकींग, यूपीआय पेमेंट आणि एटीएममधून पैसे काढण्यासही समस्यांचा सामना करावा लागला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत सरकारनं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं येस बँकेच्या पुनर्बांधणी योजनेला मंजुरी दिली आहे. भारतीय स्टेट बँक येस बँकेतील 49 टक्के इक्विटी हिस्सा खरेदी करणार आहे. या अधिसुचनेच्या सात दिवसांच्या आत संचालक मंडळही स्थापन करण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक या दोन बँका येस बँकेत गुंतवणुकीसाठी पुढे सरसावल्या आहेत. दोन्ही बँकांनी प्रत्येकी 1 हजार कोटी रूपये गुंतवणार असल्याची घोषणा केली आहे. या गुंतवणुकीमुळे आयसीआयसीआय बँकेचा पाच टक्क्यांपेक्षा अधिक इक्विटी हिस्सा होणार आहे. तर अ‍ॅक्सिस बँकही 60 कोटी रूपयांचे शेअर खरेदी करण्यासाठी 600 कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. तर कोटक मंहिंद्रा बँकेनंही येस बँकेत 600 कोटी रूपये गुंतवण्याची घोषणा केली आहे.