Breaking News

पांढऱ्या दुधातल्या काळ्या बोक्यांचा पुन्हा एकदा धुमाकूळ! निष्पाप बालकांच्या मुळावर उठलीय हावरट जमात!


अनंत अडथळे पार करत यशोशिखराकडे वाटचाल करत असलेल्या हिंदवी स्वराजाचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीत काळाच्या ओघात हरितक्रांतीबरोबरच धवलक्रांती अर्थात दुग्ध क्रांती झाली. शेतीला जोड धंदा म्हणून ओळख असलेल्या या धंद्याने गरिबीने पिचलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रपंचाला रंग रूप दिला. दुग्ध व्यवसायाच्या या मार्गावरून वाटचाल करत असतांना शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे खुळखुळायला लागले. मात्र जशी सर्वच क्षेत्रात हावरट प्रवृत्ती कार्यरत आहे, तशी दुग्ध व्यवसायातदेखील काही अपप्रवृत्ती शिरल्या आणि गरीब शेतकऱ्याला हातभार देणारा धंदा बदनाम झाला. दुर्दैवाने या धंद्यात आर्थिक स्थैर्य आलेले असतानाही काही हावरट अशा या दुष्ट प्रवृत्ती निष्पाप बालकांच्या मुळावर उठल्या आणि पांढऱ्या दुधातल्या या काळ्या बोक्यांचा पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु झाला. अशा वाईट परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह अन्न आणि औषध प्रशासनाने दूध संकलन करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वच संकलन केंद्रांवर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
अहमदनगर तालुक्यातील पारगाव भातोडी येथे अन्न आणि औषध प्रशासनाने दूध केंद्रावर छापा टाकून दीड लाख रुपयांची व्ही पावडर जप्त केली. तर पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील पारस व्ही आर एस फूड या दूध संकलन केंद्रावर छापा टाकून ७५० लिटर भेसळयुक्त दूध, २५ किलोच्या व्ही एस पावडरच्या २३ गोण्या आणि लिक्विड सोल्युशन असे साहित्य जप्त केले. आईस्क्रीम तयार करण्यासाठी वापरण्यात येत असलेली व्ही एस पावडर अनेक ठिकाणी वापरली जात असल्याचे या विभागाच्या कारवाईत समोर आले आहे. या पावडरमुळे फॅट वाढत असली तरी चार पैसे जास्त मिळविण्याच्या नादात आपण समाजाची किती मोठी फसवणूक करतोय, याचे यत्किंचितही भान दूध भेसळ करणाऱ्या या मंडळींना राहत नाही. शहराच्या आजूबाजूलाच दूध भेसळ होते, अशी परिस्थिती अजिबात नाही. ग्रामीण भागांत तर या दूध भेसळीने केव्हाच अक्राळविक्राळ रूप धारण केले. त्यामुळे निष्पाप  बालकांना हे दूध पाजण्याऐवजीएकवेळ पुराणातल्या पुतना मावशीचे दूध पाजलेले बरे. अर्थात ते हल्ली मिळत नाही, हा भाग वेगळा. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर व्ही पावडर वापरुन तयार करण्यात आलेले दूध हे पुतना मावशीच्या दुधापेक्षा घातक असल्याचे समोर आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलेली दीड कोटी रुपयांची व्ही पावडर कोठून आली, त्या पावडरचे उत्पादन कुठे तयार होते, त्या पावडरचे ट्रान्सपोर्टेशन अर्थात वाहतूक कशी चालते, त्या पावडरमुळे मानवी हाडांवर काय काय विपरित परिणाम होतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे अन्न औषध प्रशासनाने जनतेला देण्याची खरी गरज आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या या कारवाईत एक गंभीर बाब समोर आली आहे. ज्या पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या संकलन केंद्रामार्फत भेसळीचे हे दूध बाजारपेठेत नेण्यात येणार होते, त्यामध्ये बीड जिल्ह्यातील काही दूध संकलन केंद्रचालकांचा हात आहे. त्यामुळे या कारवाईत हिमनगाचे एक टोक असपडले असून संपूर्ण हिमनग किती भयानक असेल, याची कल्पनादेखील भीतीदायक वाटते.
दूध भेसळ आणि कृष्णप्रकाश यांची आठवण
तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या आदेशाने त्यावेळी जिल्ह्यात दूधभेसळ करणाऱ्या काही दूध संकलन केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी गणेशोत्सवाला नुकताच प्रारंभ झाला होता. त्यावेळी कृष्णप्रकाश यांनी भिंगारमध्ये जे काही वक्तव्य केले, त्याची आठवण अन्न आणि औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे प्रकर्षाने झाली. कृष्णप्रकाश म्हणाले होते, 'निष्पाप बालकांनी कोणाचे काय घोडे मारले, जे असले भेसळीचे दूध त्यांना प्यायला दिले जाते. यात पालकांची काहीच चूक नाही. दूध धंद्यातील भेसळीची त्यांना काहीही कल्पना नसते. फक्त दूधवाला आला, की दूध घ्यायचे, महिन्याला त्याला दुधाचे पैसे द्यायचे, हेच शहरातील चाकरमान्यांना आणि व्यापाऱ्यांना माहित असते. मात्र संबंधित दूधवाला किती आणि कशी दूध भेसळ करतो, दुधात काय काय टाकतो, याची शहरातील निष्पाप लोकांना माहिती नसते. त्यामुळे या दूधभेसळीच्या मुळापर्यंत जाऊन संबधितांविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी लागणार आहे'. कृष्णप्रकाश यांच्यानंतर नगरला खमक्या आणि धाडसी स्वभावाचा अधिकारी मिळाला नाही आणि दूधभेसळ करणाऱ्या बोक्यांविरुद्ध मोक्का कायद्यानुसार कारवाई झाली नाही.