Breaking News

जवळेमध्ये मेंढ्यांच्या कळपावर हल्ला एक मेंढी ठार


निघोज/ प्रतिनिधी ः
पारनेर तालुक्यातील जवळे येथे गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केल्याने एक मेंढी ठार झाली.
  अलभर वस्तीनजीक शेतकरी बाजीराव अलभर यांच्या कांद्याच्या शेतात बाळू धरम या मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांचा तळ टाकला आहे. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास मादी बिबट्यासह तिच्या दोन बछड्यांनी या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. मेंढ्यांभोवती जाळी लावलेली असतानाही बिबट्याने एक मेंढी पळवली. ही मेंढी या हल्ल्यात ठार झाली. यावेळी कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बाळू धरम यांच्या लक्षात हा प्रकार आला. कुत्र्यांच्या आवाजांमुळे बिबट्या फरफटत नेत असलेली मेंढी टाकून पळाला. या प्रकाराची गुरुवारी सकाळी परिसरात चर्चा झाली. यामुळे बिबट्याबाबत परिसरात दहशत पसरली आहे. बिबट्यांना तात्काळ जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
संबंधित गरीब मेंढपाळाला भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा तुकाराम अलभर, बाजीराव अलभर यांनी दिला आहे.
मादी बिबट्या आणि बछड्यांना काही नागरिकांनी जवळे येथे शेतांमध्ये काही दिवसांपूर्वी पाहिले होते. याबाबत वनविभागाकडे वारंवार तक्रारीही करण्यात आल्या आहेत. परंतु त्याची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त होत आहे.