Breaking News

ती गोळी जखमी तरुणाकडूनच सुटली गावठी कट्टा हाताळताना घडला प्रकार


पारनेर/ प्रतिनिधी ः
चौघांच्या भांडणादरम्यान गोळी लागल्याचा बनाव करणार्‍या संजय पवार याला स्वतः गावठी कट्टा हाताळतानाच गोळी लागल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
चौघांचे भांडण सुरु होते. आपण मोटारसायलकवरुन जाताना त्यांच्यापैकी एकाकडून गावठी कट्ट्यातून गोळी सुटून आपण जखमी झाल्याचे पवार याने सांगितले होते.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुरुवार (दि. 5)  मार्च रोजी सकाळी 10 वाजता टाकळीहाजी- गुणोरे रस्त्यावर दाजीला भेटण्यासाठी संजय पवार आला होता. तो मेहुण्याला भेटून आपल्या गावी राळेगण थेरपाळ येथे निघाला होता. टाकळीहाजी- गुणोरे रस्त्यावर ओढ्याजवळ तीन ते चार तरुण भांडण करत होते. यावेळी तेथून संजय पवार आपल्या मोटारसायकलवर जात होता. भांडण करणार्‍या तिघांपैकी कोणीतरी गोळीबार केला, ती गोळी संजयच्या उजव्या हाताच्या दंडाला लागली, असा बनाव संजय याने केला होता.
शिरूर येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे तो दाखल झाला होता. याचा साक्षीदार त्याचा दाजी दादाभाऊ चव्हाण होता. डॉक्टरांनी त्याच्या उजव्या दंडातून गोळी काढली. परंतु पोलिसांना जबाब देताना जखमी तरुण आणि त्याचा दाजी यांच्या जबाबात पोलिसांना तफावत जाणवली.
संशय बळावल्याने पारनेर सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गवळी, पोलिस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, हवालदार अशोक निकम, चौगुले यांनी अधिक तपास केला. पोलिसांनी गुणोरे - टाकळीहाजी रस्त्यावर ओढ्याजवळ साक्षीदार दादाभाऊ चव्हाण यांच्याबरोबर जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. परंतु तेथे कोठेही काडतुसाची पुंगळी व रक्त दिसले नाही.
 यानंतर साक्ष देणारा दादाभाऊ चव्हाण यांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी वास्तव सांगितले. संजय मला भेटण्यासाठी टाकळी येथे आला होता. त्याच्याजवळील गावठी कट्टा तो मला दाखवत होता. गावठी कट्टा हाताळत असताना अचानक गावठी कट्याचा ट्रीगर दाबला गेल्यामुळे गोळी सुटून ती गोळी संजयच्या उजव्या हाताच्या दंडात घुसली, अशी कबुली चव्हाण यांनी दिली. चव्हाण आणि जखमी संजय पवार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून गावठी कट्टा व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.