Breaking News

ग्रामीण भागातील शाळांनाही सुटी जाहीर करावी

अहमदनगर/ प्रतिनिधी : कोरोना व्हायरसच्या विषाणूचा महाराष्ट्रात वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व शिक्षण विभागाने राज्यातील शहरी भागातील सरकारी व खाजगी शाळा दि.31 मार्चपर्यंत बंद करण्याचे परिपत्रक काढले असून, यामध्ये ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीमधील शाळांचा देखील समावेश करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. 
कोरोना विषाणू शहरासह ग्रामीण भागात देखील पसरण्याची शक्यता आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ग्रामीण भागातील शाळा देखील 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे व शालेय शिक्षण विभागाला देण्यात आले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
निवेदनात म्हटले आहे की, जवळपास भारतातील 102 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची भीती आहे. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहे. देशाच्या शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोना पसरण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या हद्दीतील बहुतांशी ग्रामपंचायत शाळा या नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या जवळपास आहेत. विद्यार्थ्यांचे पालक जवळच्या तालुका व शहरी भागात कामानिमित्त जात असतात. तसेच ग्रामपंचायत विभागातील शेतकरी, छोटे व्यापारी, गावातील वाहन व्यवस्थेचे रिक्षा ड्रायव्हर, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, महसूल विभाग, घरकाम करणारे, तसेच इतर खाजगी नोकरी करणारे ग्रामस्थ ग्रामपंचायत विभागातून नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका विभागाच्या हद्दीत येत असतात. अशा अवस्थेत दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारा पालक, शिक्षक, विद्यार्थी यांच्यामध्ये सर्वांच्या संपर्कात येत असतो. करोना व्हायरस विषाणूंचा संसर्ग असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा संपर्क होऊ शकतो. अशा अवस्थेत विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी दक्षतेचा उपाय म्हणून ग्रामपंचायत विभागातील सर्व सरकारी व खाजगी शाळा बंद ठेवण्याची मागणी शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र  वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठानकर, कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे, संजीवनी रायकर, महिला आघाडीप्रमुख पूजा चौधरी, कार्यालयीन मंत्री सुनील पंडित, राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे, कार्यवाह सुधाकर म्हस्के यांनी निवेदनाद्वारे केली आहे.