Breaking News

गुंडप्रवृत्तीच्या वाळूतस्करांचा 'गॉडफादर कोण'? राजाश्रयाविना वाळूमाफियांचे अस्तित्व कवडीमोल!


balasaheb shete / mo. 7028351747. 
काळ्या आईला पोखरुन पोखरुन पर्यावरणाची नासधूस करणारे वाळूतस्कर दिवसेंदिवस कायदा आणि व्यवस्थेला 'नाकापेक्षा मोती जड' व्हायला लागले आहेत. सोन्याचे मोल लाभलेल्या वाळूच्या जोरावर कोट्यवधी कमवायचे, गुंड पोसायचे, बेकायदा कट्टे हाताळत दहशत निर्माण करायचीआणि कोणी नडलाच  तर त्याला तोडण्याची हिंमत ठेवणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या वाळूतस्करांचा 'गॉडफादर' कोण, हा प्रश्न सामान्यांसह जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाला गेल्या अनेक वर्षांपासून सतावत आहे. एक मात्र नक्की राजाश्रयाविना वाळूमाफियांचे अस्तित्व अक्षरशः कवडीमोल आहे, यात शंका असण्याचे काहीच कारण नाही. ज्या राजकारणी मंडळींच्या वळचणीला वाळूमाफिया जात आहेत, त्या राजकारणी मंडळींच्या खरे तर जिल्हा पोलीस दलाने पहिल्यांदा नाड्या आवळण्याची आवश्यकता आहे. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे हे असं होईल, अशी कल्पना करणं म्हणजे केवळ दिवास्वप्न पाहणं होईल. परंतु वाळूमाफियांच्या विरोधात उभे ठाकण्याची दुदर्म्य इच्छाशक्ती आणि 'नॉन करेप्टेड' अधिकाऱ्यांची फौज असेल तर यात अशक्य काहीच नाही, हेही तितकेच खरे.
जामखेड तालुक्यात मंडळाधिकाऱ्यासोबत आज, दि. मध्यरात्रीनंतर जो प्रकार घडला, तो प्रकार वाळूतस्करांची हिंमत किती आणि कशी वाढते आहे, याचं ज्वलंत उदाहरण आहे. वाळूचा ट्रक जप्त करुन तहसीलदार कार्यालयाकडे नेत असतांना सदर ट्रकचालकाने तो ट्रक तहसील कार्यालयाकडे नेण्याऐवजी भलतीकडेच नेत मंडळाधिकाऱ्याचे अपहरण करण्याचा पराक्रम केला. विशेष म्हणजे या गडबडीत ट्रकमधील वाळू रस्त्यावरच खाली केली. सुदैवाने तहलसीलदार विशाल नाईकवाडे यांनी क्षणाचाही विलंब लावता जामखेड आणि आष्टी पोलिसांना या ट्रकचालकाच्या प्रतापाची माहिती दिली आणि मंडलाधिकारी नंदकुमार गव्हाणे यांच्या सुटकेसाठी पटापट निर्णय घेतले. यात मुख्य प्रश्न हा आहे, की वाळूतस्करांमध्ये सरकारी माणसाचे अपहरण करण्याची एवढी अचाट ताकद येते कुठून? याचे उत्तर सोपे आहे आणि ते म्हणजे राजकारणी मंडळींच्या वळचणीला गेलेल्या वाळूतस्करांकडून या मंडळींना मिळणार 'मलिदा' हे होय. जे सत्ताधारी आहेत, त्यांनीच हे वाळूतस्कर पोसले आहेत. सत्तेवर असतांना हे गुंड प्रवृत्तीचे वाळूतस्कर पोसायचे, त्यांच्याकडून  'मलिदा' आणि सत्ता जाताच आणि मलिदा बंद होताच या गुंड वाळूतस्करांच्या नावाने शिमगा करायचा, ही खरे तर आपल्या राजकारणी मंडळींची मानसिकता आहे. त्यामुळेच आपल्या आदर्श लोकशाहीमध्ये वाळूतस्कर कायदा आणि सुव्यवस्थेच्या नाकात दम आणत आहेत. राजकारणी मंडळींच्या मांडीला मांडी लावून बसणारे वाळूतस्कर महसूल शाखेच्या अधिकाऱ्याचे अपहरण करत असतील, सरकारी अधिकाऱ्याच्या अंगावर वाळूचा ट्रक घालण्याचे धाडस करत असतील कायदा, नियम हे काय फक्त सामान्य लोकांसाठीच आहेत का? हे असेच सुरु राहिले तर वाळूमाफियांच्या गुडप्रवृत्तीचा बिमोड कसा होणार? वाळू वाहतुकीनमुळे चांगले रस्ते खचत आहेत. वाळूच्या डंपर्समुळे रस्त्यावर खोल खोल खड्डे पडत आहेत. पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे. पाण्याची पातळी खालावली जात आहे. एवढे सारे होत असताना आपली लोकशाही, आपले कायदे आणि आपले पोलीस फक्त हातावर हात धरूनच गंमत पाहत बसणार का, याचा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आहे.
वाळूमाफियांचे 'कनेक्शन' तपासा!
राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा असलेल्या या जिल्ह्यातील काही तालुक्यांचा अपवाद वगळता उर्वरित ठिकाणी वाळूतस्कर आणि तालुक्याचे आमदार, जि. . सदस्य, स्थानिक पोलीस ठाणे असे 'नेटवर्क' कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते याविषयी वेळोवेळी आवाज उठविण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र त्या सामाजिक कार्यकर्त्यांना बदनाम करायला हे वाळूतस्कर मागे पुढे पाहत नाहीत. पैशांची गुर्मी, सत्तेचा आश्रय आणि राजकारणी मंडळींशी असलेले आर्थिक लागेबांधे यामुळे वाळूतस्कर वरचढ ठरत आहेत. यासाठी प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक वाळूतस्कराचे 'कनेक्शन' तपासण्याची हिंमत जिल्हाप्रशासन, महसूल शाखा आणि पोलीस या सर्वांनी दाखविण्याची खरी गरज आहे.