Breaking News

निर्भयाच्या दोषींना आज फाशी राष्ट्रपतींनी आरोपींचा दुसरा दयेचा अर्ज स्वीकारला नाही


नवी दिल्ली :  निर्भया बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ज्या दिवशी बलात्कार झाला त्या दिवशी आपण दिल्लीमध्ये नव्हतो, असे दावा मुकेश सिंह याने केला होता. त्याची याचिका आधी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आता सर्वोच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली. तसेच सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची दयेची याचिका राष्ट्रपतींनी स्वीकारली नाही. त्यामुळे दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे.या प्रकरणातील चारही दोषींना शुक्रवारी, 20 मार्चला दिल्लीतील तिहार तुरुंगात फासावर लटकविण्यात येणार आहे.
याप्रकरणी उच्च न्यायालयाने सविस्तर आणि तर्कपूर्ण निकाल दिला आहे. त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नाही, असे न्या. ब्रजेश सेठी यांनी म्हटले आहे. मुकेश सिंह, अक्षय ठाकूर, पवन गुप्ता आणि विनय शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता या चौघांनाही फाशी देण्यात येणार आहे. तिहार तुरुंगात ज्या ठिकाणी या चौघांना फाशी देण्यात येणार आहे. त्या ठिकाणाची गुरुवारी पुन्हा एकदा पाहणी करण्यात आली. यावेळी पवन जल्लादही उपस्थित होते. पवन जल्लाद हेच चौघांना फाशी देणार आहेत. याआधी तीन वेळा या चौघांची फाशीची शिक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. या चौघांनीही राष्ट्रपतींकडे दयेची याचिका केली होती. पण ती फेटाळण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या फेरविचार आणि न्यायसुधार याचिकाही सर्वोच्च न्यायालयाने आधीच फेटाळल्या आहेत. आरोपींपैकी एक असणार्‍या पवन गुप्ताची क्युरेटीव्ह पेटीशन फेटाळून लावण्यात आली आहे. तर पवन आणि अक्षय या दोघांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केलेला दयेचा अर्ज केला होता. या दोघांनी राष्ट्रपतींकडे दुसर्‍यांदा दयेचा अर्ज केला होता. तो राष्ट्रपतींनी दाखल करून घेण्यास म्हणजेच स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात येणार आहे. निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अक्षय ठाकूर वगळता इतर तीन दोषी पवन, विनय आणि मुकेश यांच्या कुटुंबीयांनी शेवटची भेट घेतली आहे. दोषी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज सुरु ठेवले जाऊ शकते. निर्णय येण्यासाठी रात्र होऊ शकते. पण दोषींसमोरील सर्व पर्याय संपले असल्याने फाशी रद्द होणे अशक्य आहे.